सोलापुरात तृतीयपंथी अयुब सय्यदचा खून उघड; ६ तासांत पोलिसांची मोठी कामगिरी, तिघांना अटक

इरफान शेख, सोलापूर : सोलापुरात तृतीयपंथी अयुब सय्यद यांचा शुक्रवारी रात्री निर्घृण खून झाल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली होती. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, सोलापूर पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या सहा तासांत हा खून उघडकीस आणत तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, चोरीच्या उद्देशाने तिघांनी अयुब सय्यद यांचे उशीने तोंड दाबून हत्या केली. खून केल्यानंतर आरोपींनी अयुबकडील सर्व सोन्याचे दागिने लंपास केले होते. खून केल्यानंतर तिघेही आरोपी अयुब सय्यद यांची दुचाकी घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले होते. याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा ठरवत लातूर येथे धाड टाकली आणि तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
यशराज उत्तम कांबळे (वय २१, रा. इंदिरा नगर, लातूर),
आफताब इसाक शेख (वय २४, रा. कुंभारवाडी, ता. रेणापूर, जि. लातूर)
आणि वैभव गुरूनाथ पनगुले (रा. कुंभारवाडी, ता. रेणापूर, जि. लातूर).

या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेल्या जलद कारवाईमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन आरोपीपैकी एक संशयीत आरोपी आफताब इसाक शेख हा तृतीयपंथीचा खास मित्र होता.वारंवार तृतीयपंथी आणि त्या आरोपीच्या भेटी झाल्या होत्या. तृतीयपंथी अयुब सय्यद याकडे मोठ्या प्रमाणात सोन आणि भरपूर पैसा असल्याने आफताबच्या नियतीत खोट निर्माण झाली होती. आफताब हा लातूर जिल्ह्यात मजुरीचे काम करत होता. इंजिनिअरिंगच्या दोन मित्रांना सोबत घेतलं त्याने अयुबच्या घरातील सोनं आणि पैसा चोरी करण्याचा डाव रचला होता. त्यामध्ये तीन आरोपींनी अयुब सय्यदचा उशीच्या साहाय्याने तोंड दाबून खून केला आणि दागिने रोख रक्कम तसेच तृतीयपंथी अयुबची दुचाकी चोरून घेऊन गेले. यशराज कांबळे आणि वैभव पनगुले हे दोघे लातूर जिल्ह्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत.

तांत्रिक तपास करत पोलिसांनी आरोपीचा शोध लावला

सोलापूर पोलीस दलातील गुन्हे शाखेकडील स.पो.नि. शंकर धायगुडे, स.पो.नि. विजय पाटील, स.पो.नि. शैलेश खेडकर, स.पो.नि. दत्तात्रय काळे, पो.उपनि. मुकेश गायकवाड, ग्रेड पो. उपनि. शामकांत जाधव व त्यांचे पोलीस पथक तसेच सदर बझार पो.स्टे. कडील सपोनि सागर काटे व त्यांचे पोलीस पथक यांनी तांत्रिक माहितीचे आधारे व सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी केली होती.
तीन संशयीत इसमांनी खून केला आणि आरोपी हे लातूर जिल्ह्याचे दिशेने गेल्याचे खात्रीशीर दिसून आले.सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांना गोपनिय माहिती मिळाली.तिन्ही संशयीत आरोपी लातूर शहरातील विवेकानंद चौक येथील पाण्याचे टाकी जवळील परिसरात आहेत.सोलापूर पोलिसांनी ताबडतोब तिघा जणांना लातूर येथून ताब्यात घेतले.