भारताची पहिली बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; रेल्वे मंत्र्यांची अधिकृत घोषणा
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या
इतिहासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची प्रतीक्षा आता संपत आली आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी एका विशेष कार्यक्रमात
देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या व्यावसायिक प्रवासाची अधिकृत तारीख जाहीर केली.
येत्या १५ ऑगस्ट २०२७ रोजी भारताची पहिली बुलेट ट्रेन रुळावरून धावणार
असल्याची घोषणा त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केली. अहमदाबाद–मुंबई बुलेट
ट्रेन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ही सेवा गुजरातमधील सूरत ते बिलिमोरा या दोन
स्थानकांदरम्यान सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण मार्ग
सुरू केला जाईल, असे
रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम एकूण पाच
टप्प्यांत विभागण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सूरत ते
वापीपर्यंतचा मार्ग पूर्ण केला जाईल. तिसऱ्या टप्प्यात अहमदाबादपर्यंत बुलेट ट्रेन
पोहोचेल, तर चौथ्या टप्प्यात ही सेवा महाराष्ट्रातील ठाणे
शहरापर्यंत विस्तारली जाईल. पाचव्या आणि अंतिम टप्प्यात अहमदाबाद ते मुंबई हा
संपूर्ण ५०८ किलोमीटरचा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या
गुंतागुंतीचा असल्याने पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी
लागणार असल्याचेही रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.
नॅशनल हाय स्पीड रेल
कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) च्या माहितीनुसार, या ५०८ किमी लांबीच्या
प्रकल्पातील ३४८ किमी मार्ग गुजरातमध्ये, १५६ किमी
महाराष्ट्रात तर उर्वरित ४ किमी दादरा आणि नगर हवेलीमध्ये आहे. साबरमती ते
मुंबईदरम्यान एकूण १२ स्थानके प्रस्तावित असून त्यामध्ये साबरमती, अहमदाबाद, आणंद, वडोदरा,
भरूच, सूरत, बिलिमोरा,
वापी, बोईसर, विरार आणि
ठाणे या स्थानकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ताशी ३२० किमी वेगाने धावणारी ही
बुलेट ट्रेन मुंबई–अहमदाबाद हे अंतर अवघ्या २ तास ७ मिनिटांत पूर्ण करणार आहे.
त्यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होऊन देशातील दळणवळण
व्यवस्थेला नवे परिमाण मिळणार आहे.