शक्तीपीठ महामार्गावर मोठा निर्णय; वादग्रस्त भाग वगळून नव्या मार्गाला मंजुरी
पंढरपूर : शक्तीपीठ महामार्गाबाबत अखेर मोठा आणि निर्णायक बदल समोर
आला आहे. या महामार्गाच्या आधीच्या प्रस्तावित मार्गाला पंढरपूर तालुक्यातील
शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत होता. सुपीक शेती, पाणीसमृद्ध भाग आणि भीमा नदीचा पट्टा
बाधित होणार असल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. या पार्श्वभूमीवर वादग्रस्त भाग
वगळून नव्या मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी
अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या
मार्गात बदल करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे पंढरपूर तालुक्यातील
शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे. आधीचा प्रस्तावित मार्ग पूर्वी हा
महामार्ग पंढरपूर तालुक्यातील कासोगाव, अनवली, खर्डी, तापकीर शेटफळ, आंबे,
रांजणी, विटे, पोहोरगाव आदी
गावांमधून जाणार होता. या संपूर्ण भागातून भीमा नदी वाहते आणि येथे बागायती शेती
मोठ्या प्रमाणावर केली जाते. जमीन संपादनासाठी कमी मोबदला मिळण्याची शक्यता
असल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढला होता. प्राथमिक सर्वेक्षण आणि रेखांकनानंतर आंदोलन
अधिक तीव्र झाले, त्यामुळे मार्ग बदलणे प्रशासनासाठी
अपरिहार्य ठरले.
कसा असेल नवा मार्ग?
नवीन रेखांकनानुसार, शक्तीपीठ महामार्ग आता पंढरपूर
तालुक्याच्या पश्चिम भागातून जाणार आहे.हा महामार्ग बार्शी – वैराग – करकंब – भोसे
– पटवर्धन कुरोली मार्गे सांगोल्याला जोडला जाणार असल्याची माहिती आहे. सध्या या
नव्या मार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण सुरू असून प्रशासनाकडून याबाबत गोपनीयता पाळली
जात आहे. या बदलामुळे पंढरपूर तालुक्यातील नव्या परिसरात विकासाला चालना मिळेल,
अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर–सांगलीत नाराजी दरम्यान, नागपूर ते गोवा जोडणाऱ्या प्रस्तावित ग्रीनफिल्ड शक्तीपीठ महामार्गाच्या
मार्गात बदल केल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त
करण्यात येत आहे. ‘कोल्हापूर जिल्हा शक्तीपीठ एक्सप्रेसवे समर्थन समिती’ने या
निर्णयावर आक्षेप घेतला असून, या जिल्ह्यांना वगळण्यात
आल्यामुळे असंतोष वाढल्याचा दावा करण्यात आला आहे.