सोलापूर महापालिका निवडणूक: महाविकास आघाडीची जागावाटप घोषणा, भाजपविरोधात एकत्रित रणनिती
सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकत्र येत जागावाटपाची अधिकृत घोषणा केली आहे. काँग्रेस, ठाकरेसेना, राष्ट्रवादी (शरद पवार गट), माकप आणि मनसे हे पक्ष भाजपला रोखण्यासाठी एकत्र आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सोलापुरात आता भाजप-शिवसेना युती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांगितले की, आम आदमी पार्टी (आप) आणि वंचित बहुजन आघाडीलाही सोबत येण्याचे आवाहन करण्यात आले होते, मात्र अद्याप त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. सोलापूर महापालिकेच्या एकूण १०२ जागांसाठी महाविकास आघाडीतील जागावाटप निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार,
- काँग्रेस – ४५
जागा
- ठाकरेसेना – ३०
जागा
- राष्ट्रवादी (शप) – २०
जागा
असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती शिवसेना (ठाकरे गट)
शहरप्रमुख अजय दासरी यांनी दिली. तसेच येत्या ४ तारखेला खासदार प्रणिती
शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील,
नरसय्या आडम, खासदार ओमराजे
निंबाळकर आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत महाविकास
आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, जागावाटपावरून आघाडीतील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेसला
ठाकरेसेनेपेक्षा अधिक जागा मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी दिसून आली. ठाकरे
गटाचे उत्तर विधानसभा शहरप्रमुख महेश धाराशिवकर यांनी याबाबत अजय दासरी
यांना जाब विचारला. पत्रकार परिषदेदरम्यान शिवसैनिकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली,
यावेळी धाराशिवकर आणि दासरी यांच्यात शाब्दिक वाद झाला. एकमेकांना
“बघून घेण्याची” भाषा झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.