आरबीआयची मोठी कारवाई; कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह चार संस्थांवर लाखोंचा दंड

मुंबई :
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल देशातील तीन सहकारी बँका आणि एका खासगी फायनान्स कंपनीवर आर्थिक दंड ठोठावला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, कोल्हापूर यांचा समावेश आहे. आरबीआयने २२ डिसेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर २.१० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तपासणीदरम्यान या बँकेने बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम २० आणि कलम ५६ चे उल्लंघन केल्याचे आढळून आले. आरबीआयच्या माहितीनुसार, संबंधित बँकेने एका कंपनीला कर्ज मंजूर केले होते, ज्यामध्ये बँकेचा एक संचालकच जामीनदार म्हणून सहभागी होता. हे नियमबाह्य असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, बँकेने दिलेले लेखी उत्तर, अतिरिक्त माहिती तसेच तोंडी जबाबाचा विचार करून आरबीआयने हा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला.

इतर बँका आणि फायनान्स कंपनीवरही दंड

या कारवाईत तेलंगणातील वारंगळ जिल्हा सहकारी बँक आणि तामिळनाडूतील द सलेम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक यांच्यावरही आर्थिक दंड लावण्यात आला आहे. या दोन्ही बँकांमध्ये कर्जवाटप प्रक्रियेत नियमांचे पालन न झाल्याचे तपासणीत उघड झाले आहे.

याशिवाय, वॅल्यूकॉर्प सिक्युरिटीज अँड फायनान्स लिमिटेड या खासगी फायनान्स कंपनीवरही आरबीआयने कारवाई केली आहे. कंपनीने

  • क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना आवश्यक ग्राहक माहिती न देणे,
  • केवायसी (KYC) नियमांचे उल्लंघन करणे,
  • निश्चित मर्यादेपेक्षा जास्त रकमेचे कर्ज हस्तांतरण करणे

अशा गंभीर त्रुटी केल्याचे तपासात समोर आले आहे.

आरबीआयने स्पष्ट केले आहे की, ही कारवाई संबंधित संस्थांच्या आर्थिक स्थितीवर किंवा ग्राहकांशी असलेल्या व्यवहारांवर थेट परिणाम करणारी नसून, नियामक नियमांचे पालन न केल्याबद्दलची शिस्तभंगात्मक कारवाई आहे.