इंस्टाग्रामवरील प्रेमसंबंधातून खंडणी; १० लाखांच्या मागणीनंतर वडिलांनी टोकाचे पाऊल उचलले

सोशल मीडियावरील वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे पुन्हा एकदा एक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. Instagram वरून ओळख वाढवत एका महिलेनं सचिन (नाव बदललेले) यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. काही दिवस गोड बोलून विश्वास संपादन केल्यानंतर तिने अचानक १० लाख रुपयांची मागणी केल्याचे समोर आले आहे. ही मोठी रक्कम देण्यास असमर्थ ठरलेल्या सचिन यांच्यावर मानसिक ताण वाढत गेला. कुटुंबीयांपासून हा प्रकार लपवण्याच्या प्रयत्नात ते अधिकच नैराश्यात गेले. अखेर तीव्र मानसिक दबाव सहन न झाल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. या घटनेनंतर कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिलेविरुद्ध फसवणूक आणि खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सायबर तज्ज्ञांच्या मते, सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी वैयक्तिक माहिती शेअर करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. प्रेमसंबंधांच्या आडून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.