दिवाळीपूर्वी पतंजलीच्या तुपावर FDA चा छापा; २०.२० लाखांचा २,२७९.७ लिटर साठा जप्त
छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या
गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील एका गोदामावर छापा टाकून
पतंजली कंपनीच्या गायीच्या तुपाचा २० लाख २० हजार १९० रुपये किमतीचा साठा जप्त
करण्यात आला आहे. तुपाच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाल्याने ही कारवाई करण्यात
आली. जप्त केलेल्या तुपाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
सुंदरवाडीतील गोदामावर FDA चा छापा
मिळालेल्या माहितीनुसार, सुंदरवाडी परिसरातील केंब्रिज स्कूलजवळ
असलेल्या मेसर्स दिव्य महावितरक, सुशील कडुबा जाधव यांच्या
गोदामावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक छापा टाकला. या ठिकाणी विक्रीसाठी
ठेवण्यात आलेल्या पतंजली कंपनीच्या गायीच्या तुपाच्या गुणवत्तेबाबत संशय आल्याने
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत कारवाई केली.
४,०३२ युनिट्समधील २,२७९.७
लिटर तूप जप्त
FDA अधिकाऱ्यांनी गोदामातून दोन टप्प्यांत
तुपाचा साठा जप्त केला. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे :
- पहिला साठा : २,९९८
युनिट्स, एकूण १,३४९.१ लिटर.
किंमत १२ लाख २९ हजार १८० रुपये.
- दुसरा साठा : १,०३४
युनिट्स, एकूण ९३०.६ लिटर. किंमत ७ लाख ९१ हजार १०
रुपये.
- एकूण जप्ती : ४,०३२
युनिट्स, एकूण २,२७९.७ लिटर.
- एकूण किंमत : २० लाख २० हजार १९० रुपये.
प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई
तुपाच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाल्यानंतर अन्न
सुरक्षा अधिकाऱ्यांनी फॉर्म III नुसार जप्तीची कारवाई केली. जप्त
केलेल्या तुपाचे नमुने तपासणीसाठी अधिकृत प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या
नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड नाही
दिवाळीसह सणासुदीच्या काळात बाजारपेठेत खाद्यपदार्थांची मागणी वाढते. अशा वेळी भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन FDA कडून तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे.नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड केली जाणार नाही. खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच राहील, असा इशारा सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.