रोहित पवारांच्या विरोधानंतर आजोबांनीच दाखवला वेगळा सूर; एआयमुळे पाणी संपत नाही - शरद पवार.
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसरात प्रस्तावित
असलेल्या एआय डेटा सेंटर प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या
प्रकल्पाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी
तीव्र विरोध दर्शवला होता. डेटा सेंटरमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होईल, असा आरोप करत त्यांनी शेतकऱ्यांसह सोलापूर-पुणे महामार्गावर रास्ता रोको
आंदोलन केले होते. दुसरीकडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि
आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरकरांनी या प्रकल्पाच्या
समर्थनार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रतिआंदोलन केले होते. ‘हा प्रकल्प झालाच
पाहिजे,’ अशी भूमिका घेत आंदोलकांनी प्रकल्पाला पाठिंबा
दर्शवला होता. त्यामुळे या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष
पाहायला मिळाला.
‘एआयमुळे पाणी संपत नाही’ – शरद पवार
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
शरद पवार यांनी या प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘एआयमुळे पाणी संपत
नसते. तंत्रज्ञानाचा गैरसमज करून घेऊ नये,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र,
यासोबतच त्यांनी पाण्याच्या वापराबाबत सावधगिरीचा इशाराही दिला.
कोणत्याही मोठ्या प्रकल्पात पाण्याचा वापर जपून आणि नियोजनबद्ध पद्धतीने झाला
पाहिजे. उजनीचे पाणी शेतकऱ्यांच्या हक्काचे असून त्याचा योग्य वापर होणे आवश्यक
आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
उजनी डेटा सेंटरच्या वादाला नवे वळण
शरद पवार यांच्या या विधानामुळे उजनी डेटा सेंटर प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चेला नवे वळण मिळाले आहे. आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या आक्रमक विरोधाच्या भूमिकेपेक्षा शरद पवार यांनी तंत्रज्ञानाबाबत गैरसमज टाळण्यावर भर देत पाण्याच्या नियोजनबद्ध वापराची भूमिका मांडली आहे. त्यामुळे उजनीतील प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्पाचा प्रश्न, त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी आणि उजनीच्या पाण्याच्या वापराबाबतची चर्चा आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.