महादासोही डॉ. शरणबसवप्पा अप्पा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार लाखो भक्तांनी साश्रूनयनांनी घेतले दर्शन

संचार वृत्तसेवा
कलबुरगी, दि. 16- येथील श्री शरणबसवेश्वर महादासोह संस्थानचे आठवे पिठाधिपती, शिक्षणमहर्षी लिंगैक्य पूज्य डॉ. शरणबसवप्पा अप्पा यांच्या पार्थिवावर लाखो भक्तांच्या साक्षीने, शासकीय इतमामात शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिल्यानंतर विविध मठांच्या महास्वामींच्या वेदमंत्रांच्या जयघोषात अंतिम संस्कार करण्यात आले. कर्नाटकसह महाराष्ट्र आणि तेलंगणातून आलेल्या लाखो भक्तांनी परमपूज्य अप्पाजींचे साश्रूनयनांनी अंतिम दर्शन घेतले.
भक्तांमध्ये पूज्य अप्पाजी नावाने प्रसिध्द असलेले अन्न दासोहासह विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमातून ज्ञानदासोहाद्वारे समाजाची समर्पित सेवा करणारे पूज्य डॉ. शरणबसवप्पा अप्पाजी गुरुवारी रात्री लिंगैक्य झाल्याचे वृत्त समजताच हजारो भक्तांनी श्री शरणबसवेश्वर दासोह महामनेकडे धाव घेतली. गुरुवारी रात्रभर शिवाराधना, भजन, शिव पंचाक्षरी मंत्राचा जप, गुरुचरणांची पादपूजा, शरण मंत्र जप करण्यात आला. रात्रभर जागरण करण्यात आले. कलबुरगी व परिसरातील भविकांनी आणि पूज्य अप्पाजींच्या अनुयायांनी गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत अखेरचे दर्शन घेतले. दूरवरून आलेल्या भविकांनी शुक्रवारी सकाळी 7 पासूनच रांगेत उभारून सायंकाळी 4 पर्यंत दर्शन घेतले. सायंकाळी 5.30 वाजता महादासोही पूज्य शरणबसवेश्वर यांचा जयघोष करीत श्री शरणबसवेश्वर मंदिराच्या आवारात पूज्य अप्पाजींवर शरण परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी शुक्रवारी पहाटे लिंगैक्य पूज्य अप्पाजींच्या पार्थिवास रुद्राभिषेक करण्यात आला. पीठारोहणाने सजवून भाविकांच्या अंतिम दर्शनासाठी शिवानुभव मंडपात स्थापित करण्यात आले. सायंकाळी 5 वाजता शरणबसवेश्वर मंदिर आवारात विविध वाद्यांसह पूज्य अप्पाजींची अंतिम यात्रा काढण्यात आली. पूज्य शरण बसवेश्वर मंदिरास पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. यावेळी हजारो भाविकांनी पुष्प आणि बिल्वपत्रांचा वर्षाव आणि जयघोष करीत अंत्यदर्शन घेतले. हारकूड संस्थानचे पूज्य चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत अनेक वैदिक स्वामींनी वचन, मंत्रपठण करीत सुमारे 10 हजार विभूती, एक लाख बिल्वपत्री अर्पण करण्यात आल्या.
अंत्यसंस्कारप्रसंगी परिस बट्टलू (परिस वाटी), पूज्य शरणबसवप्पा अप्पा यांचा फेटा, गळ्यातील लिंग आणि विभूती त्यांचे उत्तराधिकारी चिरंजीवी दोड्डप्पा अप्पा यांना प्रदान करण्यात आले. पूज्य अप्पाजींच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक महास्वामीजींसह उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, मंत्री प्रियांक खर्गे, ईश्वर खंड्रे, डॉ. शरणप्रकाश पाटील, नीती व योजना आयोगाचे उपाध्यक्ष आमदार बी. आर. पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, अल्लमप्रभू पाटील, एम. वाय. पाटील, डॉ. अजयसिंग, शरणू सलगर, कनिज फातिमा,जिल्हाधिकारी फौजिया तरन्नूम, पोलीस अधीक्षक डॉ. शरणप्पा ढगे, माजी आमदार अप्पू गौडा पाटील, माजी महापौर शरणू मोदी, सोलापूर श्री सिध्देश्वर मंदिर पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्पराज काडादी, माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्यासह राज्यातील लाखो भक्तांनी पूज्य श्री. शरणबसवप्पा अप्पाजींचे अंतिम दर्शन घेतले. अंतिम दर्शन सोहळ्याचे कर्नाटकातील प्रमुख वृत्तवाहिन्यांनी थेट प्रक्षेपण केल्याने राज्यातील विविध भागातील भक्तांनी अंतिम दर्शन घेतले.