सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय: अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित
सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अनगर
नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासकीय
कारणास्तव ही कारवाई करण्यात आली असून आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील
कार्यवाही पार पडणार आहे. अनगरसह मैंदर्गी, सांगोला, मंगळवेढा,
मोहोळ, बार्शी आणि पंढरपूर नगरपरिषदांमधील
नगरसेवक पदांच्या निवडणुकांनाही स्थगिती देण्यात आली आहे.
अनगर निवडणूक स्थगित का झाली?
काही ठिकाणी दाखल अपीलांवरील सुनावणी 23 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण झाली होती. मात्र अनगरचा न्यायालयीन निकाल 25
तारखेला लागल्याने, निवडणूक प्रक्रियेतील
तांत्रिक अडथळा निर्माण झाला. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणुका पुढे
ढकलण्यात आल्या. नवीन कार्यक्रमानुसार निवडणूक निर्णय अधिकारी आयोगाला अनगरमधील
प्रत्येक पदासाठी केवळ एकच अर्ज असल्याचे कळवतील. त्यानंतर राज्य निवडणूक आयोग
बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा करेल, अशी माहिती निवडणूक
निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा वाद
अनगर नगरपंचायत निवडणूक मागील काही दिवसांपासून मोठ्या
चर्चेत होती. सुरुवातीला नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते —
- प्राजक्ता
अजिंक्यराणा पाटील (भाजप)
- उज्वला थिटे
(राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट)
- सरस्वती शिंदे
(अपक्ष)
अर्ज छाननी दरम्यान उज्वला थिटे यांच्या
नामनिर्देशनपत्रात सूचकाची सही नसल्याचा आक्षेप नोंदवला गेला. चौकशीनंतर
त्यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आला. त्यानंतर अपक्ष सरस्वती शिंदे यांनीही अर्ज
मागे घेतला. परिणामी प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांची बिनविरोध निवड
सुनिश्चित झाली.
यानंतर या निवडणुकीतून निर्माण झालेल्या राजकीय
घडामोडींमुळे राज्यभर अनगरची चर्चा रंगली. राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे
पाटील यांनी तर थेट अजित पवारांना इशारा देत म्हटले होते — “कोणाचाही नाद करा, पण अनगरांचा नाद करू नका!”
या वक्तव्यामुळे वातावरण आणखी चिघळले आणि निवडणूक वाद अधिक चर्चेत
आला.