नर्तिका दिपाली पाटीलचा लॅाजमध्ये मृतदेह; भाजपच्या माजी नगरसेवकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा.
जामखेड | जामखेडच्या खर्डा रस्त्यावर असलेल्या एका लॅाजमध्ये
कला केंद्रात नर्तिका म्हणून काम करणाऱ्या 35 वर्षीय दिपाली
पाटील हिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ
उडाली आहे. प्राथमिक तपासात तिच्या आत्महत्येला राजकीय दबाव कारणीभूत असल्याची
शक्यता समोर आली असून प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.
भाजपच्या माजी नगरसेवकावर गंभीर आरोप
दिपालीवर लग्नासाठी सातत्याने तगादा लावल्याने ती मानसिक तणावाखाली
होती, अशी
माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. या आरोपांवरून भाजपचा माजी नगरसेवक संदीप
गायकवाड याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला
असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
रोहित पवारांचा प्रतिक्रिया ट्वीट
प्रकरण उघड झाल्यानंतर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी
या प्रकरणावर प्रतिक्रिया देत महिलेला न्याय मिळावा अशी मागणी केली. त्यांनी या
घटनेत भाजपच्या स्थानिक राजकारणावर टीकास्त्र सोडले.
घटनेचे तपशील: मैत्रिणींनी केली शोधाशोध
दिपाली पाटील मूळची कल्याणची असून ती जामखेडमधील तपनेश्वर भागात
आपल्या मैत्रिणींसोबत राहत होती. गुरुवारी ती “बाजारात जाऊन येते” असे सांगून
घराबाहेर पडली; परंतु परत न आल्याने मैत्रिणींनी तिचा शोध सुरू केला.
ज्या रिक्षातून ती गेली होती त्या चालकाने तिला साई लॅाज येथे सोडल्याचे
सांगितल्याने मैत्रिणी तेथे पोहोचल्या. लॅाजमध्ये पोहोचल्यावर खोली आतून बंद होती.
डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडताच त्यांना पंख्याला गळफास घेतलेला दिपालीचा मृतदेह
आढळला. तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले.
चौकशीत आणखी खुलास्यांची शक्यता
पोलिस तपास सुरू असून संदीप गायकवाडची चौकशी केली जात आहे. या
प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.