लाखात एक असणारे बॉम्बे ब्लड ग्रुप दुर्मीळ रक्तगटाच्या रक्तदात्यांनी वाचवले गर्भवतीचे प्राण .
सोलापूर:- ओ निगेटिव्ह रक्तगटापेक्षा अधिक दुर्मीळ रक्तगट असलेल्या
बॉम्बे ब्लड ग्रुपच्या सोलापूर येथील रक्तदात्यांनी रक्तदान करून एका गर्भवती
महिलेचे प्राण वाचविले आहे. रवींद्र दंतकाळे असे त्या रक्तदात्यांचे नाव आहे.
रवींद्र हे दैनिक 'संचार'मध्ये
उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. पंढरपूर येथील एका महिलेची प्रसूती सोलापूर येथील
एका हॉस्पिटलमध्ये झाली. प्रसूती दरम्यान सदर महिलेला रक्ताची आवश्यकता भासली,
पण महिलेचा रक्तगट दुर्मीळ बॉम्बे रक्तगट होता. तेव्हा नातेवाईक आणि
रक्तपेढीमार्फत दुर्मीळ बॉम्बे रक्तगट असणाऱ्या रक्तदात्यांना संपर्क सुरू झाला.
अशावेळी सोलापूरचे रवींद्र दंतकाळे आणि सदाशिव नगर माळशिरस येथील देविदास शेंडे
यांना रक्तदानासाठी डॉ. हेडगेवार रक्तपेढीमध्ये बोलावण्यात आले. निरोप मिळताच
रवींद्र यांनी तातडीने डॉ. हेडगेवार रक्तपेढीकडे धाव घेतली. पूर्व तपासणी करून
रक्तदान करून घेतले गेले. सदर रक्तदान झाल्यानंतर रक्ताची तपासणी झाल्यानंतर
प्रक्रिया पूर्ण करून त्या दुर्मीळ बॉम्बे रक्तगटाची रक्तपिशवी सदर महिलेच्या
नातेवाइकांना सुपुर्द करण्यात आली. या प्रक्रियेसाठी डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे
कर्मचारी आणि संचालक यांचे सहकार्य लाभले. रक्तपेढीच्यावतीने बॉम्बे ग्रुप
रक्तदाते रवींद्र दंतकाळे आणि देविदास शेंडे यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी
दोन्ही रक्तदात्यांनी डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या सेवकार्याची प्रशंसा केली आणि
जास्तीत जास्त रक्तदात्यांनी डॉ. हेडगेवार रक्तपेढीमध्ये रक्तदान करून रक्तपेढीस
सहकार्य करण्याचे आवाहन केले.
काय आहे बॉम्बे ब्लड ग्रुप
बॉम्बे ब्लड ग्रुप हा एक अत्यंत दुर्मीळ रक्तगट आहे, ज्याला एचएच रक्तगट असेही म्हणतात. या रक्तगटात लाल रक्तपेशींवर 'ए' 'बी' किंवा 'एच' प्रतिजन (अॅन्टीजेन्स) नसतात, ज्यामुळे हा रक्तगट इतर रक्ताच्या प्रकारांपेक्षा वेगळा ठरतो. १९५२ मध्ये
मुंबईत डॉ. वाय. एम. भेंडे यांनी शोध लावल्यामुळे याला 'बॉम्बे
ब्लड ग्रुप' असे नाव मिळाले. या रक्तगटाच्या व्यक्तींना रक्त
संक्रमण करताना मोठी समस्या येऊ शकते, कारण त्यांच्या
रक्तामध्ये 'अँटी-ए', 'अँटी-बी'
आणि 'अँटी-एच' या तिन्ही
प्रतिजनांविरुध्द अँटीबॉडीज असतात.