सांगोला निवडणूक चुरशीची : माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर भरारी पथकाचा छापा
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
जोरात सुरू असून हळूहळू प्रचारसभा थंडावत आहेत. दरम्यान, सांगोला परिसरात महायुतीतील पक्षांमध्येच संघर्ष तीव्र होत चालल्याचे
पाहायला मिळत आहे. भाजपा–शेकाप–दीपक साळुंखे यांच्या युतीला थेट शिंदे सेना आणि
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडून कडवे आव्हान मिळत आहे. रविवारी (३०
नोव्हेंबर) रात्री, सांगोला येथील माजी आमदार शहाजीबापू
पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक भरारी पथकाने अचानक छापा टाकला. या छापा
दरम्यान कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी
संताप व्यक्त करत पथकाच्या कारवाईवर नाराजी नोंदवली. सांगोला हे या निवडणुकांचे
अत्यंत संवेदनशील आणि चुरशीचे मैदान बनले आहे. काही दिवसांपूर्वी शहाजीबापू पाटील
यांनी भाजपावर टीका केली होती. मात्र, भाजपाच्या सभेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका करण्याचे टाळले. त्याच दिवशी
फडणवीस यांच्या सभेनंतर शहाजीबापूंनी जाहीर सभा घेत विरोधकांवर निशाणा साधला. ही
सभा संपल्यानंतर काही वेळातच भरारी पथकाच्या छाप्याची कारवाई झाली, ज्यामुळे शिंदे सेना व समर्थकांमध्ये असंतोष वाढला आहे. या छाप्यामुळे
निवडणुकीच्या वातावरणात आणखी खळबळ माजली आहे.
अंबादास दानवेंचा टोला
या घडामोडींवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी
सोशल मीडियावरून महायुतीवर टोला लगावला. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले: “गुवाहाटीला जाताना ‘झाडी डोंगर हॉटेल’ गोड लागले. आता भाजपाविरुद्ध ‘ब्र’
शब्द उच्चरला की छाप्यांची मालिका सुरू होते. खाताना उस गोड लागला, आता तोच उस पेकाटात बसतो आहे. ‘ओके मध्ये आहे’, असं
म्हणावंच लागेल आता बापू!” या पोस्टमुळे राजकीय वातावरण आणखी तापले असून
सांगोल्यातील निवडणूक पूर्वसंध्येवर राजकीय शाब्दिक चकमक वाढली आहे.