जामखेड लॅाज प्रकरण : नर्तिकेचा मृत्यू, भाजप माजी नगरसेवक अटकेत; रोहित पवारांचा तीव्र इशारा
जामखेड तालुक्यातील खर्डा रस्त्यावर असलेल्या एका लॅाजमध्ये धक्कादायक
घटना घडली आहे. कला केंद्रात नर्तिका म्हणून काम करणारी दिपाली पाटील (वय ३५) हिचा
मृतदेह लॅाजच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर परिसरात
आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासात उघड केले की
दिपालीवर लग्नासाठी जबरदस्तीचा दबाव आणला जात होता. या मानसिक तणावामुळे तिने
आत्महत्या केली असावी, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी
पोलिसांनी भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड याला अटक केली असून त्याच्यावर आत्महत्येस
प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय प्रतिक्रिया देखील
तापल्या आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेबद्दल माहिती नसल्याचे सांगत,
“कोणाच्याही मागे देव नाही. आमच्या पक्षाचा असला तरी दोषी असेल तर
सोडणार नाही,” अशी भूमिका व्यक्त केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी एक्सवरून
पोस्ट करत अनेक गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
त्यांनी विचारले –
- आत्महत्येपूर्वी त्या महिलेसोबत कोण होते?
- त्याचे कोणाशी संबंध आहेत?
- त्याला कोणत्या उच्चपदस्थांचा पाठिंबा आहे?
- त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून
निवडणूक लढवली?
तसेच, “हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही ते होऊ
देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला असून लॉजमधील
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तातडीने गुन्ह्याची उकल करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांकडून संदीप गायकवाडची कसून चौकशी सुरू असून या प्रकरणात आणखी धक्कादायक
माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.