कलबुरगीचे महादासोही डॉ. शरणबसवप्पा अप्पा लिंगैक्य दासोह महामनेत घेतला अखेरचा श्वास; आज अंतिम संस्कार

संचार वृत्तसेवा

कलबुरगी, दि.14-

येथील श्री शरणबसवेश्वर महादासोह संस्थानचे आठवे पिठाधिपती, शिक्षणमहर्षी पूज्य डॉ. शरणबसवप्पा अप्पा हे गुरूवारी रात्री साडेनऊच्या सुमारास लिंगैक्य झाले. लाखो भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री शरणबसवेश्वर दासोह महामनेत पूज्य डॉ. शरणबसवप्पा अप्पा यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. दाक्षायणी, उत्तराधिकारी सुपुत्र दोड्डप्पा अप्पा, कन्या, नातवंडे असा परिवार आहे. अप्पांजींच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता श्री शरणबसवेश्वर मंदिराच्या परिसरात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने कर्नाटक-महाराष्ट्रातील धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. 

कर्मयोगी अप्पासाहेब काडादी  यांचे पूज्य डॉ. शरणबसवप्पा अप्पा हे भाचे तर श्री. सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांचे सासरे होत.

भक्तांमध्ये अप्पाजी नावाने परिचित असलेल्या पूज्य डॉ. शरणबसवप्पा अप्पांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने 26 जुलै रोजी त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अप्पाजींच्या प्रकृतीमध्ये सुधारणाही झाली होती. मात्र गुरूवारी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने श्री शरणबसवेश्वरांचे दर्शन घेण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्याच इच्छेनुसार श्री शरणबसवेश्वर दासोह महामनेत उपचाराची व्यवस्था करण्यात आली होती. गुरूवारी सायंकाळी रूग्णालयातून अप्पाजींना श्री शरणबसवेश्वर दासोह महामनेत हलविण्यात आले. 

तत्पूर्वी श्री शरणबसवेश्वरांचे कुटुंबीयांसह अप्पाजींनी दर्शन घेतले. त्यानंतर श्री शरणबसवेश्वर दासोह महामनेत त्यांच्यावर उपचार सुरू होते. रात्री 9.23 च्या सुमारास अप्पाजींची प्राणज्योत मालवली.

दासोह परंपरेसाठी प्रसिध्द असलेल्या श्री शरणबसवेश्वर संस्थानचा वारसा समर्थपणे जपतानाच पूज्य डॉ. शरणबसवप्पा अप्पांनी अन्न दासोहासह ज्ञानदासोहही अखंडितपणे केले. अनेक शैक्षणिक संस्था उभारून लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.

 पूज्य डॉ. शरणबसवप्पा अप्पाजी हे पारंपरिक गुरुकुल शिक्षणापासून ते आधुनिक विद्यापीठीय शिक्षणापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास करणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म कलबुरगी येथे झाला. प्रारंभिक शिक्षण महादासोह महामने गुरुकुलात घेतल्यानंतर त्यांनी येथील नूतन विद्यालयातून माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी शासकीय महाविद्यालयातून बी. ए. ची पदवी घेतल्यानंतर, धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठातून एम. ए. (तत्वज्ञान) पदवी संपादन केली.

शिक्षण क्षेत्रात त्यांनी अमूल्य योगदान दिले. शरणबसवेश्वर विद्यावर्धक शिक्षण संघच्या माध्यमातून साठहून अधिक शैक्षणिक संस्था स्थापन करून नावारूपास आणल्या. या संस्थांत शाळांपासून ते अभियांत्रिकी, वैद्यकीय, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांचा समावेश आहे. शिक्षणाबरोबरच ‘दासोह’ परंपरेचा प्रसार व सर्वधर्मसमभावाचा संदेश देणे हे त्यांचे ध्येय राहिले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना डीलीट या मानद पदवीसह राज्योत्सव पुरस्कार, बसवरत्न, बसवश्री व आंतरराष्ट्रीय बसव पुरस्कार यासारखे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान बहाल करण्यात आले होते.

डॉ. अप्पाजी यांचे आयुष्य हे शिक्षण, समाजसेवा व अध्यात्म यांचा अद्वितीय संगम आहे. कल्याण कर्नाटकात त्यांनी घडवलेली शैक्षणिक क्रांती आजही लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देत आहे. डॉ. शरणबसवप्पा अप्पा यांनी राज्यातील मागासलेल्या भागातील विद्यार्थ्यांना आणि सामान्य लोकांना आधुनिक उच्च तंत्रज्ञानाचे फायदे देण्याच्या गरजेवर भर दिला आहे. त्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली श्री शरणबसवेश्वर विद्यावर्धक शिक्षण संस्थाद्वारे चालवल्या जाणार्‍या शाळा, महाविद्यालयांमध्ये आधुनिक काळातील गरजांचे अभ्यासक्रम सुरू करण्याचे धाडस केले आहे. आज त्यांची शिक्षण संस्था एक स्वतंत्र विद्यापीठ म्हणून कार्यरत आहे.

विद्यावर्धक संघ पंधरा महाविद्यालये, तीन हायस्कूल, तीन प्राथमिक शाळा आणि शरणबसवेश्वर पब्लिक स्कूल आणि स्वतंत्र प्रिंटिंग प्रेस, दोड्डप्पाअप्पा आयएएस प्रशिक्षण संस्था, ग्रंथविश्व विद्यानिलय आणि अनुभव मंटप यांच्यासह एका विशाल शैक्षणिक संकुलात विकसित झाला. येथे कला, साहित्य आणि संस्कृतीवर व्याख्यानांची मालिका आयोजित केली जाते. ग्रंथालय बांधण्यामागील प्रेरणादायी शक्ती म्हणजे डॉ. अप्पाजी होत. पब्लिक स्कूल हे प्राचीन आणि आधुनिक कला आणि वास्तूकलेचे मिश्रण आहे. शिवाय, रेखाचित्र आणि चित्रकला विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम, व्यवसाय व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका, सीए फाउंडेशन अभ्यासक्रम, संप्रेषणात्मक इंग्रजी आणि हिंदी विषयातील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम (यूजीसी योजना), जाहिरात आणि विक्री प्रोत्साहन, उपकरणे, औद्योगिक रसायनशास्त्र, विमा, कपडे आणि भरतकाम विषयातील पदविका अभ्यासक्रम, संगणक तंत्र आणि इलेक्ट्रिक मोटार वायरिंग, रेडिओ आणि टीव्ही सर्व्हिसिंग अभ्यासक्रम इत्यादी सर्व पूज्य डॉ. शरणबसवप्पा अप्पाजी यांच्या दूरदृष्टी आणि गतिमानतेचे परिणाम आहेत. 2002-2003 पासून डॉ. अप्पाजींनी संपूर्ण संगणक वातावरण प्रदान करण्याच्या उद्देशाने संगणकाशी संबंधित विषयांमध्ये नवीन पदवी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले. आमच्या सर्व संस्थेतील ग्रंथालय सुविधा पुस्तकांच्या संग्रहाच्या बाबतीत, जर्नल्सची सदस्यता, विद्यार्थ्यांना सहज प्रवेश आणि ग्रंथालयात शांत वातावरण या बाबतीत विद्यापीठापेक्षा चांगल्या आहेत.

   डॉ. शरणबसवप्पा अप्पा यांनी प्राचीन भारतीय अध्यात्मवादाला आधुनिक काळातील गतिमान व्यावहारिकतेशी जोडण्याचा प्रयत्न केला आणि पाश्चात्य उच्च-तंत्रज्ञान आणि आधुनिक कल्पनांची सांगड घातली आहे. आधुनिक दृष्टी, गतिमानतेने शैक्षणिक प्रगती आणि विविधतेची नवीन क्षितिजे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. विचार, शब्द आणि कृतीमध्ये त्यांनी दासोहभावाच्या आत्म्याचे प्रतीक म्हणून समर्पण आणि निःस्वार्थ सेवेचे सर्वोच्च स्वरूप दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. 

 या शिक्षणसंस्थेत तरुण नवोदित व्यवसाय प्रशासकांना प्रशिक्षण देताना दासोह-भाव म्हणजेच सेवाभावना रुजवतो. कोणत्याही प्रशासकासाठी, सेवाभावी बोधवाक्य हे अनिवार्य असते, मग ते व्यवसाय, प्रशासन, नागरी प्रशासन, आरोग्यसेवा किंवा शैक्षणिक प्रशासन या आपल्या संस्थेतील कर्मचारी आणि विद्यार्थी हे दासोह तत्वज्ञानाचे मूर्त स्वरूप आहेत. अशी त्यांची शिकवण होती.

डॉ. अप्पाजी यांच्या उदात्त सेवेची दखल घेत कर्नाटक सरकारने त्यांना राज्योस्तव पुरस्काराने सन्मानित केले आणि 1992 मध्ये गुलबर्गा विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. व्यवस्थापन शिक्षणात अग्रणी असलेल्या नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीने 4 मार्च 2002 रोजी त्यांच्या नाशिक कॅम्पसमध्ये पूज्य अप्पाजींचा सन्मान केला आणि पुण्यश्लोक शिव-पार्वती आध्यात्मिक पुरस्कार प्रदान केला. तसेच 2002 मध्ये डॉ. अप्पाजींना सुवर्ण मंदिर, अमृतसर येथील शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (एसजीपीसी) कडून सन्मानित करण्यात आले. 

संसदेच्या आवारात महात्मा बसवेश्वर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात पूज्य अप्पाजींचे योगदान महत्वाचे होते. महात्मा बसवेश्वरांचा हा पुतळा अप्पाजींनी देशाला समर्पित केला.

पुरस्कार आणि सन्मान

* 1988 साली कर्नाटक सरकारचा कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार

* 1991 मध्ये अखिल भारत वीरशैव महासभेच्या अध्यक्षपदी निवड

* 1999 गुलबर्गा विद्यापीठाची सन्मानीय डॉक्टरेट पदवी

* हैदराबाद, कर्नाटक विभागातील नागरिकांकडून विद्या भंडारी पदवी बहाल

* 1992 मध्ये गुलबर्गा विद्यापीठाची डि.लिट (डॉक्टर ऑफ लिटरेचर) पदवी

* 4 मार्च 2002 रोजी नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीकडून पुण्यश्लोक शिव-पार्वती आध्यत्मिक पुरस्कार प्रदान

* 22 मार्च 2002 रोजी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात शिरोमणी गुरुद्वार समितीकडून सन्मान

* कर्नाटक सरकारच्या ललित कला अकादमीचा कलाउपासक सन्मान

* 1 जानेवारी 2024 रोजी श्री. सुभाषचंद्र पाटील स्मारक जनकल्याण ट्रस्टचा गौडा प्रसस्थी सन्मान

* 2 ऑक्टोबर 2022 मध्ये हरकुड मठ यांच्याकडून श्री. चन्नरेणुका बसव प्रसस्थी पुरस्कार

* बेळगाव येथे झालेल्या अखिल भारत वीरशैव संमेलनाचे अध्यक्ष 

* शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित संस्थानी त्यांचा सन्मान केला आहे.

* डॉ. शरणबसवप्पा अप्पा यांचा जीवन परिचय

* उत्तर कर्नाटकातील कलबुर्गीमधील मठाचे प्रमुख असलेले डॉ. शरणबसवप्पा अप्पाजी हे हैदराबाद, कर्नाटक या भागामध्ये आदरणीय व्यक्ती म्हणून ओळखले जातात. शरणबसवेश्वर मंदिर आणि शैक्षणिक संस्थांमुळे सर्वत्र परिचित आहे.

जन्म:14 नोव्हेंबर 1935 

शिक्षण– प्राथमिक शिक्षण गुरुकुल पध्दतीने महादासोह महामने येथे झाले. हायस्कूलचे शिक्षण एन. व्ही. स्कूल त्यानंतर त्यांनी शासकीय महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठातून तत्वज्ञान विषयातून एम.ए. पूर्ण केले. 

शैक्षणिक क्षेत्रातील योगदान ः 

* शरण बसवेश्वर विद्यावर्धक संघाचे सचिव 

* 1971 मध्ये पब्लिक स्कूलच्या धर्तीवर शरण बसवेश्वर निवासी शाळेची स्थापना

* 1974 साली हैदराबाद, कर्नाटक शिक्षण सोसायटीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड

* धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाचे सिनेट सदस्य 

* गुलबर्गा विद्यापीठाच्या पायाभूत विकास समितीचे चेअरमन

* महिलांच्या शिक्षणासाठी अनेक शाळा, महाविद्यालय, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थांची उभारणी

* पर्यटनाला चालना देण्यासाठी 2010 मध्ये मास्टर ऑफ ट्युरिझम विभाग सुरू

* 1975 मध्ये विनाअनुदानित एम. ए. फाईन आर्ट अभ्यासक्रम सुरू.

* 2017 मध्ये शरण बसव विद्यापीठाची स्थापना 

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून शोक 

शरणांची भूमी कलबुरगी येथील महादासोही शरणबसवेश्वर महासंस्थानचे मठाधिपती डॉ. शरणबसवप्पा अप्पाजी लिंगैक्य झाल्याचे वृत्त वेदनादायी आहे. महात्मा बसवेश्वर आणि शरणांनी  घालून दिलेल्या कायक आणि दासोहाच्या मार्गावर सच्चे बसव अनुयायी म्हणून शरणबसवप्पा अप्पा यांनी केलेले कार्य कर्नाटक कधीही विसरणार नाही. 

सिध्दरामय्या, मुख्यमंत्री कर्नाटक