पंतप्रधान नरेंद्र मोदींचे इथिओपियाच्या संसदेत ऐतिहासिक भाषण, सर्वोच्च सन्मान स्वीकारताना व्यक्त केली कृतज्ञता

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या त्यांच्या पहिल्या अधिकृत इथिओपिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांनी त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान ‘द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथियोपिया’ प्रदान केला. या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पंतप्रधान मोदींनी सांगितले की, “हा केवळ माझा सन्मान नाही, तर भारत देशाचा सन्मान आहे.”

आज आदिस अबाबा येथे पंतप्रधान मोदींनी इथिओपियाच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी लोकशाहीच्या या मंदिरात येणे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले. “आज तुमच्यासमोर उभे राहणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आणि सौभाग्य आहे. सिंहांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इथिओपियात येऊन मला पूर्णपणे घरी असल्यासारखे वाटते,” असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी भारत आणि इथिओपियामधील सांस्कृतिक साम्यांवरही प्रकाश टाकला. भारताचे राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’ आणि इथिओपियाचे राष्ट्रगीत दोन्ही मातृभूमीला आई म्हणून संबोधतात, हे नमूद करत त्यांनी सांगितले की ही गीते आपल्याला आपल्या वारशाचा, संस्कृतीचा आणि देशाच्या संरक्षणाचा अभिमान बाळगण्यास प्रेरित करतात. भारताच्या १.४ अब्ज नागरिकांच्या वतीने मैत्री, सौहार्द आणि बंधुत्वाचा संदेश देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, इथिओपियाच्या लोकशाही प्रवासाबद्दल, येथील संसद आणि जनतेबद्दल त्यांना अपार आदर आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून ते शेतकरी, उद्योजक, महिला नेतृत्व आणि देशाचे भविष्य घडवणाऱ्या तरुणांशी संवाद साधत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दौऱ्याच्या शेवटी त्यांनी इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान नम्रतेने स्वीकारत तो भारताच्या जनतेला अर्पण केला.