अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला जन्मठेप

सोलापूर : तेरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आरोपीने केलेल्या अत्याचारामुळे पीडिता गर्भवती राहिली होती. तिने बाळाला जन्म दिल्यानंतर आरोपीने गुन्हा केल्याचे कृत्य सत्य असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी आरोपी विकास दिगंबर शिंदे (वय ५०, रा. मनोहरनगर, झोपडपट्टी) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एन. सुरवसे यांनी मरेपर्यंत जन्मठेप व वीस हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. आरोपीने पीडितेच्या थंड पेयात काही तरी मिसळून पाजल्याने ती चक्कर येऊन पडली. तेव्हा त्याने पीडितेवर अत्याचार केला. ही बाब पीडितेच्या आईच्या लक्षात आल्यानंतर आईने फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आमिष दाखवून आरोपीने पीडिता ही अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिच्यावर अत्याचार केला. यातून पीडितेस झालेल्या बाळाचे जनक आरोपी विकास असल्याचे डी.एन.ए. अहवालावरून व साक्षीपुराव्याद्वारे सरकारी वकिलांनी निदर्शनास आणले.

न्यायालयाने आरोपी विकास शिंदे यास भादंवि कलम ३७६, ३ प्रमाणे आजन्म कारावासाची शिक्षा व २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने सक्त कारावासाची शिक्षा सुनावली. शिवाय मनोधैर्य योजनेखाली रक्कम पीडितेस देण्याचा आदेश विधी सेवा प्राधिकरण यांना केला.