लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणात महिला डॉक्टर शाहीन शाहिदचा महाराष्ट्र कनेक्शन उघड

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाने देशाला हादरवून सोडलं आहे. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला असून, २४ जण गंभीर जखमी आहेत. गृहमंत्रालयाने तपास राष्ट्रीय तपास संस्था (NIA) कडे सोपवल्यानंतर चौकशी आणखी वेगाने सुरू आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या एका दहशतवादी मॉड्यूलने या हल्ल्यामागील कट रचला होता. यामध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या महिला डॉक्टर शाहीन शाहिद हिला फरिदाबाद येथून अटक करण्यात आली. पोलिसांनी तिच्या कारमधून एके-४७ रायफल आणि जिवंत दारूगोळा जप्त केला आहे. शाहीन शाहिद ही कानपूरमधील गणेश शंकर विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयातील माजी प्राध्यापक आहे. तिचे जैश-ए-मोहम्मदच्या महिला शाखेशी संबंध आहेत का, याची चौकशी सुरू आहे. तपासात असेही दिसून आले आहे की, ती भारतामध्ये महिला दहशतवादी ब्रिगेड तयार करण्याची योजना आखत होती. महाविद्यालयीन नोंदीनुसार, २०१३ पासून ती सूचनांशिवाय गैरहजर राहू लागली, ज्यामुळे २०२१ मध्ये तिला सेवेतून काढून टाकण्यात आले. तपास पथकाने लखनऊतील तिच्या घरासह भावाच्या आणि वडिलांच्या घरावर छापे टाकले असून, डिजिटल पुरावे आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. फरिदाबादमध्ये अटक केलेल्या डॉ. मुझम्मिल शकील याच्या चौकशीतून शाहीनचे नाव समोर आले. मुझम्मिलकडून जप्त कारमध्ये स्फोटके आणि एके-४७ मिळाले होते. त्याने पोलिसांना सांगितले की शाहीन त्याची ओळखीची असून काही काळापूर्वी ती त्याच्या संपर्कात आली होती. त्यानंतर शाहीनला ताब्यात घेण्यात आले. तपासात आणखी धक्कादायक गोष्ट उघड झाली की, शाहीनचा भाऊ परवेझ याने सहारनपूरमध्ये तिच्या नावावर कार खरेदी केली होती, जी स्फोटक वाहतुकीसाठी वापरली गेल्याचा संशय आहे.

 महाराष्ट्र कनेक्शन समोर

डॉ. शाहीन शाहिदचा निकाह महाराष्ट्रातील डॉ. जफर सईद यांच्याशी झाला होता. मात्र २०१५ मध्ये घटस्फोट झाल्यानंतर ती लखनऊमध्ये स्थायिक झाली. त्यानंतर तिची ओळख डॉ. मुझम्मिल शकीलशी झाली, ज्याच्यासोबत ती पुढे कट रचण्यात सहभागी झाली होती. शाहीनच्या कारमधून एके-४७ रायफल, जिवंत दारूगोळा आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त झाल्याने पोलिस तपास आणखी तीव्र झाला आहे. महाराष्ट्राशी तिचे संबंध समोर आल्याने राज्य पोलिस आणि गुप्तचर यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.