सोलापुरात उद्धवसेनेत तीव्र अंतर्गत वाद; तिकीट विक्रीचे आरोप, सामूहिक राजीनाम्याचा इशारा

सोलापूर : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस येऊन ठेपला असतानाही सोलापुरातील उद्धवसेनेतील अंतर्गत वाद अधिकच तीव्र झाला आहे. उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी यांनी पैसे घेऊन तिकीट विकल्याचा आरोप करत शहरप्रमुख महेश धाराशिवकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. जोपर्यंत दासरी यांना पक्षातून काढले जात नाही, तोपर्यंत पक्षात सक्रियपणे काम करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शुक्रवार पेठेतील एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत शहरप्रमुख महेश धाराशिवकर, प्रताप चव्हाण, शहर संघटक सूरज जगताप, विधानसभा प्रमुख बाळासाहेब गायकवाड यांच्या उपस्थितीत नाराज पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केले. महत्त्वाच्या प्रभागांतील जागा जिल्हाप्रमुखांनी सोडल्याचा तसेच निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या राजीनाम्यांची घोषणा केली. प्रताप चव्हाण यांनी सांगितले की, पूर्वी सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन उमेदवारी दिली जात होती; मात्र आता तक्रारी करूनही पक्षाकडून दखल घेतली जात नाही. मीनाक्षी गवळी यांनी तिकीट वाटप करताना निष्ठावंतांचा विचार केला नाही, असा आरोप करत अस्मिता गायकवाड यांच्यावरही टीका करण्यात आली. प्रभाग क्रमांक ७, जिथून शिवसेनेचा पहिला नगरसेवक निवडून आला होता, ती जागा मित्रपक्षाला का देण्यात आली, असा सवालही उपस्थित करण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आंदोलनाच्या वेळी पक्षासाठी २४ तास हजर राहिलो; मात्र उमेदवारी देताना दुसऱ्यांनाच संधी दिली गेली. त्यामुळे जिल्हाप्रमुख असेपर्यंत आम्ही पक्षात काम करणार नाही आणि निष्ठावंत उमेदवारांचाच प्रचार करू, इतर ठिकाणी विरोधात काम करू, असा इशाराही देण्यात आला. दरम्यान, जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. पद, प्रतिष्ठा सोडून पैशाच्या मागे लागल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. वैशाली सातपुते यांनीही निवड समितीवर आरोप केले.

याच पार्श्वभूमीवर उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनी सोमवारी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला. पक्षातील अंतर्गत वादामुळे राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते स्वतः प्रभाग २४ मधून इच्छुक होते. त्यांच्या पत्नीला भाजपकडून तिकीट मिळाल्यानेच त्यांनी राजीनामा दिल्याचा दावा काही कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांची कन्या पूजा खंदारे यांनी जिल्हा युवती सेना सहसचिवपदाचा राजीनामा देत सायंकाळी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून सुरू असलेल्या या गोंधळाकडे पक्षाचे वरिष्ठ नेते दुर्लक्ष करत असल्याची टीकाही कार्यकर्त्यांकडून होत आहे.