स्विस आल्प्समधील प्रसिद्ध ‘ले कॉन्स्टेलेशन’ बारला भीषण आग; नववर्षाच्या जल्लोषात १० जणांचा मृत्यू

स्वित्झर्लंडमधील स्विस आल्प्स पर्वतरांगांमध्ये असलेल्या प्रसिद्ध क्रान्स-मोंटाना स्की रिसॉर्टमध्ये नववर्षाच्या जल्लोषाला मोठे गालबोट लागले आहे. येथील ‘ले कॉन्स्टेलेशन’ (Le Constellation) या नामांकित बारमध्ये बुधवारी रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीत किमान १० जणांचा मृत्यू झाला असून सुमारे १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. गुरुवारी स्थानिक पोलिसांनी या घटनेची अधिकृत माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दीडच्या सुमारास ‘ले कॉन्स्टेलेशन’ बारमध्ये अचानक आग लागली. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी या बारमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केल्याने इमारतीत प्रचंड गोंधळ उडाला आणि लोकांनी जीव वाचवण्यासाठी बाहेर पळ काढला. या दुर्घटनेत ८ ते १० जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस प्रवक्ते गॅटन लॅथियन यांनी सांगितले की, “सध्या तपास प्राथमिक टप्प्यात आहे. क्रान्स-मोंटाना हे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध स्की रिसॉर्ट असल्याने येथे मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक येतात. मृत आणि जखमींच्या नातेवाईकांसाठी विशेष मदत केंद्र आणि हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आले आहेत.” क्रान्स-मोंटाना हे ठिकाण प्रसिद्ध मॅटरहॉर्न पर्वतापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आहे. या पर्यटनस्थळी घडलेल्या भीषण आगीच्या घटनेमुळे संपूर्ण स्वित्झर्लंडमध्ये शोककळा पसरली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून, स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन विभागाकडून सखोल तपास सुरू आहे.