मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार; महिला डब्यातून तरुणीला चालत्या ट्रेनमधून फेकले
मुंबई : शहराची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमध्ये एक
अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पनवेल–सीएसएमटी मार्गावरील लोकल ट्रेनच्या
महिला डब्यात एका १८ वर्षीय तरुणीला चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकल्याचा प्रकार
घडला असून, यामुळे महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न
पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर
खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १८ डिसेंबर रोजी
पनवेल–सीएसएमटी लोकलच्या महिला डब्यात एक ५० वर्षीय पुरुष प्रवासी चढला होता.
महिला डब्यात पुरुष प्रवासी असल्याने तरुणीने त्याला खाली उतरण्याची विनंती केली.
मात्र, यावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाच्या भरात आरोपीने
थेट त्या तरुणीला चालत्या लोकलमधून धक्का देत खाली फेकले. ही तरुणी रेल्वे रुळावर
पडून गंभीर जखमी झाली. जखमी अवस्थेत तिने आपल्या वडिलांना फोन करून घडलेला प्रकार
आणि आपले स्थान सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला शोधून रुग्णालयात दाखल केले,
जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेदरम्यान काही सतर्क
प्रवाशांनी धाडस दाखवत महिला डब्यात चढून आरोपीला पकडले, त्याला
मारहाण करत खाली उतरवले आणि जीआरपी पोलिसांच्या ताब्यात दिले. जीआरपी पोलिसांनी
आरोपी शेख अख्तर नवाज याला अटक केली असून न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला तीन
दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे
महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिला डब्यातील सुरक्षेवर गंभीर
प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.