जेजुरीत भंडाऱ्याच्या उधळणीत आग, १८ जण भाजले; सुप्रिया सुळे यांची चौकशीची मागणी

जेजुरी : जेजुरी नगरपरिषदेच्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर होताच गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाच्या चरणी भंडारा अर्पण करण्यात येत होता. यावेळी फटाके वाजवण्यात येत होते तसेच भंडाऱ्याची उधळण सुरू होती. याचदरम्यान अचानक भंडाऱ्यामुळे आगीचा भडका उडाला आणि या घटनेत तब्बल १८ जण भाजले गेले. या जखमींमध्ये काही नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचाही समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शासनाने या घटनेची तातडीने चौकशी करून जबाबदार असणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

ही घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. या घटनेबाबत मी सविस्तर माहिती घेतली असून प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहे. या दुर्घटनेत जखमी झालेले सर्वजण लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करते,” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. सुळे यांनी पुढे नमूद केले की, जेजुरीत अनेक ठिकाणी भेसळयुक्त भंडारा विक्री होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीच स्थानिकांनी प्रशासनाकडे केल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

जेजुरी नगरपरिषदेत राष्ट्रवादीची बाजी

दरम्यान, जेजुरी नगरपरिषदेवर सत्तांतर घडवत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. माजी आमदार संजय जगताप यांची सत्ता संपुष्टात आणत राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारभाई मोठ्या फरकाने विजयी झाले. राष्ट्रवादीचे एकूण १७ नगरसेवक निवडून आले असून, विजयानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला होता. मात्र, या आनंदोत्सवाला अचानक लागलेल्या आगीमुळे गालबोट लागले.