राज्यातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा, 15 जानेवारी 2026 रोजी मतदान
राज्याच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेल्या महापालिका
निवडणुकांची अखेर आज घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की
महाराष्ट्रातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेतल्या
जाणार आहेत. या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी केली जाणार आहे. ही माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त
दिनेश वाघमारे यांनी दिली. नामनिर्देशन पत्रे ऑफलाईन पद्धतीने स्वीकारली जाणार
असून, राजकीय पक्षांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला
आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे महापालिका निवडणुका प्रलंबित
होत्या. अखेर आज निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग येण्याची
शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 23 ते 30
डिसेंबर 2025 दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता
येणार आहेत. 31 डिसेंबरला अर्जांची छाननी होईल, तर 2 जानेवारी 2026 रोजी
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत असेल. 3 जानेवारी 2026 रोजी अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.
दरम्यान, नागपूर आणि चंद्रपूर महापालिकांमध्ये 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेल्याची चर्चा होती. मात्र, आयोगाच्या सूत्रांनी स्पष्ट केले की न्यायालयाच्या कोणत्याही आदेशात अशा
ठिकाणी निवडणूक घेऊ नये, असे नमूद केलेले नाही. त्यामुळे
सर्व 29 महापालिकांसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात
आला आहे.
या निवडणुकांमध्ये बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक,
औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, नागपूर, सोलापूर,
कोल्हापूर, अमरावती, लातूर,
पनवेल, जालना यांसह एकूण 29 महापालिकांचा समावेश आहे.