कबड्डी सामन्यात थरारक हत्या; राणा बालाचौरियावर गोळ्या झाडून खून

प्रसिद्ध कबड्डीपटू कंवर दिग्विजय सिंह ऊर्फ राणा बालाचौरियाची पंजाबमधील मोहाली येथे कबड्डी सामन्यादरम्यान गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. सोमवारी सायंकाळी सोहाना साहिब कबड्डी कपच्या सामन्यात ही घटना घडली. सेल्फी काढण्याच्या बहाण्याने आरोपी बालाचौरियाजवळ आला आणि अचानक त्याच्यावर गोळ्या झाडल्या. डोक्यात आणि चेहऱ्यावर अनेक गोळ्या लागल्याने राणा बालाचौरिया जागीच कोसळला. त्याला तातडीने मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर संपूर्ण पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. या हत्येची जबाबदारी काही आरोपींनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्वीकारली आहे. ही हत्या गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा बदला म्हणून करण्यात आल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. पोस्टनुसार, राणा बालाचौरियाचे संबंध जग्गू खोती आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीशी होते तसेच त्याने मूसेवाला हत्येतील आरोपींना आश्रय दिला होता, असा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडिया पोस्टच्या आधारे तपास सुरू केला आहे. या हत्येनंतर पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.