बांगलादेशातील आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण; वृत्तपत्र कार्यालयांवर हल्ले, जाळपोळ

बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाने आता अत्यंत हिंसक स्वरूप धारण केले आहे. गुरुवारी संतप्त आंदोलकांनी राजधानी ढाका येथील दोन नामांकित वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर हल्ला करत इमारतींना आग लावली. या घटनेदरम्यान अनेक पत्रकार आणि कर्मचारी इमारतीत अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने कारवाई करत शिडीच्या सहाय्याने सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. ढाक्यातील प्रसिद्ध ‘द डेली स्टार’ या वृत्तपत्राच्या कार्यालयावर आंदोलकांनी अचानक हल्ला केला. कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली आणि त्यानंतर संपूर्ण इमारतीला आग लावण्यात आली. आगीमुळे धुराचे मोठे लोट पसरले आणि कार्यालयातील पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही पत्रकार छतावर अडकले होते, त्यांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले. दरम्यान, या हिंसाचारादरम्यान जमावाने एका हिंदू व्यक्तीला बेदम मारहाण करत झाडाला बांधून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बांगलादेश सरकारने देशभरातील मोबाईल इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. शाळा आणि महाविद्यालये आधीच बंद ठेवण्यात आली असून ढाकासह अनेक शहरांमध्ये लष्करी दले तैनात करण्यात आली आहेत. आंदोलकांचा म्होरक्या उस्मान हादी याला आठवड्याभरापूर्वी गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे सांगितले जात आहे.