पुणेतील राजगुरूनगरमधील खासगी कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्याची निर्घृण हत्या

राजगुरूनगरमध्ये एका खासगी कोचिंग क्लासमध्ये सोमवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. दहावीचे विद्यार्थी नेहमीप्रमाणे क्लाससाठी आले असताना विद्यार्थ्यांमधील वाद उफाळून आला आणि त्यातून एका विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली. क्लासमध्ये शिकवणी सुरू असताना काही विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हिंसाचारात होताच एका विद्यार्थ्याने धारदार शस्त्राने दुसऱ्या विद्यार्थ्यावर हल्ला केला. हल्लेखोराने विद्यार्थ्याचा गळाच चिरल्याने वर्गात रक्ताचा सडा पडला आणि एकच गोंधळ उडाला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षक घाबरून गेले. एक विद्यार्थी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाला, मात्र त्याच्यावरही हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या पुष्कर शिंगाडे या विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात आणखी एक विद्यार्थी जखमी झाला आहे. हल्ला करणारा विद्यार्थी घटनास्थळावरून दुचाकीवरून फरार झाला होता. मात्र, नंतर तो आपल्या सहकाऱ्यासह थेट पोलीस ठाण्यात गेला आणि घडलेल्या घटनेची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, १३ ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थी वर्गात उपस्थित होते. दोन वर्गांचा क्लास एकत्र सुरू असतानाच ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.