‘मला अटक करा’; मेट्रो-रेल्वे निर्बंधांवर अभिजीत दीपकेंचा संताप, ‘आंदोलन होणारच’चा निर्धार
नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतर येथे १० ऑक्टोबरला प्रस्तावित
कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी
परवानगी दिलेली नाही. मात्र, परवानगी मिळाली नसली तरी आंदोलन
होणारच, अशी भूमिका CJPचे कार्यकर्ते
अभिजीत दीपके यांनी घेतली आहे. आंदोलनासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक किंवा
ताब्यात घेतले तरी त्यासाठी तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकडे येणाऱ्या रेल्वे आणि मेट्रो सेवांवर निर्बंध घालण्याच्या निर्णयावर दीपके यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकार तरुणांना घाबरत असल्याचा आरोप करत त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवरही निशाणा साधला. “तुम्ही एवढे का घाबरत आहात? तुम्हाला देशातील तरुणांची भीती वाटते का? रेल्वे आणि मेट्रो बंद करत असाल तर सामान्य माणसाने काय करायचे?” असा सवाल अभिजीत दीपके यांनी उपस्थित केला. सार्वजनिक वाहतूक तसेच रस्त्यांवरील निर्बंधांमुळे सामान्य नागरिकांनाही त्रास होत असल्याचे त्यांनी म्हटले. दिल्ली कोणाची खासगी मालमत्ता आहे का, असा सवाल करत आंदोलनामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे सांगणाऱ्या सरकारने वाहतूक निर्बंधांमुळे होणाऱ्या त्रासाचाही विचार करावा, असे त्यांनी म्हटले.
‘मला अटक करा’, दीपकेंचे
आव्हान
आंदोलनादरम्यान CJPच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले
किंवा अटक केली तरी आपण तयार असल्याचे दीपके यांनी स्पष्ट केले. “किती जणांना
ताब्यात घेणार? मला अटक करा, ताब्यात
घ्या. सौरव तयार आहे, आशुतोषही तयार आहे,” असे ते म्हणाले. जंतर-मंतर हे आंदोलनासाठी निश्चित ठिकाण असल्याचा दावा
करत त्यांनी पोलिसांच्या परवानगीच्या नियमावरही प्रश्न उपस्थित केला. संविधानातील
अनुच्छेद १९ नागरिकांना आंदोलनाचा अधिकार देतो, असे सांगत
आंदोलनासाठी परवानगी घेण्याची आवश्यकता काय, असा सवाल
त्यांनी केला.
निवडणूक प्रक्रियेवरही गंभीर आरोप
दीपके यांनी निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांच्या
मुद्द्यावरूनही सरकार आणि निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले. “१३ कोटी मते
हटवण्यापूर्वी जनतेची परवानगी घेतली होती का?” असा सवाल त्यांनी केला. बेंगळुरूमध्ये
जिवंत व्यक्तींना मृत दाखवून त्यांची मते मतदारयादीतून काढण्यात आल्याचा दावाही
त्यांनी केला. निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात आंदोलन करण्याचा अधिकार
असल्याचे सांगत देशातील लोकशाही व्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी आंदोलन करणार
असल्याचे त्यांनी म्हटले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही दीपके
यांनी प्रश्न उपस्थित केले. मतदारयादीतील कथित बदल आणि निवडणूक प्रक्रियेतील
पारदर्शकतेच्या मुद्द्यावर त्यांनी आक्षेप नोंदवला.
दिल्ली पोलिसांची आंदोलनाला परवानगी नाही
दरम्यान, जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला होणाऱ्या CJPच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. पोलिसांच्या
म्हणण्यानुसार, CJPकडून आंदोलनाची माहिती उशिरा देण्यात आली.
जंतर-मंतरवर आंदोलन करण्यासाठी किमान १० दिवस आधी परवानगीसाठी अर्ज करणे आवश्यक
असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
CJPच्या प्रमुख मागण्या काय?
CJPकडून निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. मतदारयादीतील मतांची कथित वजावट, जिवंत व्यक्तींना मृत दाखवणे आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव याबाबत संघटनेने प्रश्न उपस्थित केले आहेत. मतदारयादीची पारदर्शक तपासणी, चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आलेली नावे पुन्हा समाविष्ट करणे आणि निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणणे या CJPच्या प्रमुख मागण्या आहेत. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही संघटनेकडून करण्यात येत आहे.