परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची सोलापूर बसस्थानकाला अचानक भेट; अस्वच्छता पाहून अधिकाऱ्यांना धरले धारेवर
सोलापूर : राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज
सोलापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट दिली. कोणतीही पूर्वकल्पना न देता ते
थेट बसस्थानकात दाखल झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. बसस्थानक परिसरातील
अस्वच्छता आणि प्रवाशांसाठी असलेल्या सुविधांची दुरवस्था पाहून मंत्री सरनाईक
यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अस्वच्छता पाहून अधिकाऱ्यांना जाब
बसस्थानक परिसरातील अस्वच्छता, दुर्गंधी येणारी स्वच्छतागृहे आणि प्रवाशांसाठी आवश्यक सुविधांचा अभाव पाहून परिवहनमंत्र्यांनी उपस्थित विभागीय अधिकारी आणि बसस्थानक प्रमुखांना धारेवर धरले. "प्रवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित सेवा देणे ही एसटीची जबाबदारी आहे. इतकी अस्वच्छता कशी काय?" असा सवाल प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना केला.
एसटी बसमध्ये प्रवाशांशी साधला थेट संवाद
यानंतर मंत्री सरनाईक यांनी स्वतः एसटी बसमध्ये चढून प्रवाशांशी संवाद साधला. बसमधील स्वच्छता, गाड्यांचे वेळापत्रक, तिकीट दर आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत त्यांनी प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. काही प्रवाशांनी आपल्या अडचणी आणि तक्रारी मांडल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने त्या सोडवण्याचे आदेश दिले.परिवहनमंत्र्यांच्या या अचानक भेटीमुळे बसस्थानक प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. या पाहणीनंतर तरी बसस्थानकातील स्वच्छता आणि प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा होईल, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.