दुबई एअर शोमध्ये ‘तेजस’ लढाऊ विमान कोसळून स्फोट; भारतीय हवाई दल चिंतित

दुबई :- दुबई येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय एअर शोमध्ये आज, शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी भारतासाठी धक्कादायक घटना घडली. एरोबॅटिक प्रदर्शनादरम्यान भारतीय हवाई दलाचे स्वदेशी बनावटीचे ‘तेजस’ (Tejas) लढाऊ विमान कोसळले. या अचानक झालेल्या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण एअर शो परिसरात खळबळ उडाली आहे. हिंदुस्तानन एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) निर्मित हे हलके लढाऊ विमान स्थानिक वेळेनुसार दुपारी सुमारे २.१० वाजता कोसळले, अशी माहिती भारतीय हवाई दलाने (IAF) निवेदनाद्वारे दिली.
माहितीनुसार, ‘तेजस’ विमान हवाई कसरती करत असताना ‘नोजडाईव्ह’ दरम्यान अचानक जमिनीकडे वेगाने झेपावले आणि तीव्र धडकेत ते क्षणार्धात नष्ट झाले. थरारक व्हिडिओ समोर या भीषण अपघाताचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. यात ‘तेजस’ विमान आकाशातील कलाबाजीदरम्यान अचानक नियंत्रण सुटून खाली कोसळताना दिसत आहे. जमिनीवर आदळताच प्रचंड स्फोट झाला आणि आगीचा मोठा गोळा उसळल्याचे दृश्य दिसते.

पायलट सुरक्षित की नाही?

अपघाताच्या वेळी पायलटने वेळेत इजेक्ट केले की नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिली गेलेली नाही. भारतीय हवाई दलाचे सविस्तर निवेदन अपेक्षित असून, या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. तेजस प्रकल्पाचे महत्त्व तेजस’ हे भारताचे महत्त्वाकांक्षी स्वदेशी लढाऊ विमान प्रकल्प असून, भारताची हवाई क्षमता प्रदर्शित करण्यासाठी दुबई एअर शोमध्ये त्याचे विशेष प्रदर्शन ठेवले होते. मात्र, आज झालेल्या या अपघातामुळे भारतीय संरक्षण क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.