प्रेमासाठी पाकिस्तानी युवकाचा थरारक निर्णय! अटकेपासून वाचण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा पार करून भारतात प्रवेश

प्रेमासाठी लोक कोणत्याही थराला जातात हे अनेकदा सिद्ध झाले आहे. मात्र, यावेळी ही कहाणी चक्क आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडील आहे. राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि फिल्मी घटना समोर आली आहे. पाकिस्तानातील एका युवकाने आपल्या प्रेमसंबंधांमुळे निर्माण झालेल्या धोक्यापासून वाचण्यासाठी थेट भारताची सीमा पार केली. सध्या हा युवक बाडमेर पोलिसांच्या ताब्यात असून सुरक्षा यंत्रणांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

कुटुंबीयांनी दाखल केला गुन्हा — आणि सुरु झालं पळणं!

बाडमेरच्या सीमावर्ती सेडवा भागात २६ नोव्हेंबर रोजी हा पाकिस्तानचा नागरिक भारतीय हद्दीत घुसल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. संशयास्पद स्थितीत फिरणारा हा तरुण पाहून गावकऱ्यांनी तात्काळ सीमा सुरक्षा दलाला (BSF) संपर्क साधला. BSF ने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आणि पुढील चौकशीसाठी बाडमेर पोलिसांकडे सोपवले.

चौकशीत धक्कादायक उघड — “प्रेमासाठी आलो!”

सुरक्षा एजन्सींच्या संयुक्त चौकशीत या युवकाने आपले नाव हिंदाल असल्याचे सांगितले. तो पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मीठी जिल्ह्यात राहतो.
चौकशीत त्याने कबूल केले की—

  • त्याचे एका शेजारी महिला सोबत प्रेमसंबंध होते
  • ही बाब कुटुंबीयांना समजताच त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला
  • अटक होण्याच्या भीतीने तो पळून भारताच्या हद्दीत शिरला

हिंदाल म्हणाला:
मला अटकेत जायचं नव्हतं, त्यामुळे मी ३०० मीटर भारतीय हद्दीत शिरलो आणि गोठ्यात लपून बसलो.”

लपून बसताना गावकऱ्यांनी त्याला पाहिले आणि संशय आल्याने ते थेट BSFकडे गेले.