पुणे विमानतळावरील इंडिगोचा गोंधळ; १६ फ्लाइट रद्द, अमोल कोल्हे नाराज — “यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच!”

इंडिगो एअरलाईन्सच्या विमानांच्या वेळापत्रकात आलेल्या मोठ्या गोंधळामुळे पुणे विमानतळावरील विमानसेवा पूर्णपणे विस्कळित झाली आहे. गेल्या दोन दिवसांत १६ पेक्षा जास्त उड्डाणे रद्द, तर १९ हून अधिक फ्लाइटला प्रचंड विलंब झाला आहे. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अमोल कोल्हेंचा संताप: “यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच!” या गोंधळाचा परिणाम खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनाही भोगावा लागला. फ्लाइटला दोन तास विलंब, त्यानंतर तीन तास वाट पाहिल्यानंतर फ्लाइट अखेर रद्द करण्यात आली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले— सिस्टीम वेळ वाया घालवत असली तरी मी नाही! तीन तासांनी फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप आहेच, पण होऊ दिला नाही याचं अधिक बरं वाटतं. इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती… यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच! जय शिवराय!”

ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

राहुल गांधींची केंद्रावर टीका

या घडामोडींवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर कठोर टीका करत म्हटले—

इंडिगोचा गोंधळ हा सरकारच्या मक्तेदारी मॉडेलचा परिणाम आहे. पुन्हा एकदा, विलंब, रद्द झालेली उड्डाणे आणि हतबलता याचे परिणाम सामान्य भारतीयांना भोगावे लागत आहेत.”

देशभरात 550 हून अधिक फ्लाइट रद्द

गोंधळ केवळ पुण्यापुरता मर्यादित नाही. देशातील मोठ्या विमानतळांवर — दिल्ली, मुंबई, बंगळुरू — 550 पेक्षा अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. प्रवाशांकडून सोशल मीडियावर सतत तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

गोंधळाचे कारण काय?

विमान कंपनी म्हणून देशातील सर्वात मोठी ओळख असणाऱ्या इंडिगोचे व्यवस्थापन गेल्या काही दिवसांपासून मोठ्या अडचणीत आहे.
उड्डाणे रद्द होण्यामागे—

  • अंतर्गत व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी,
  • वेळापत्रक नियोजनातील विसंगती,
  • कर्मचारी उपलब्धता आणि ऑपरेशनल कमकुवतपणा

अशी कारणे समोर येत आहेत.

इंडिगोने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, विमानसेवा फेब्रुवारीपासून पूर्णपणे सुरळीत होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.