उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद; मुलाच्या वक्तव्यामुळे राजन पाटीलांनी अजित पवारांची मागितली माफी
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे राजकीय वारे निर्माण केले. अनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यामुळे ही पहिलीच निवडणूक होती आणि नुकतेच राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केलेल्या राजन पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र, सूचकाची सही नसल्याच्या तांत्रिक कारणामुळे त्यांचा अर्ज बाद झाला आणि निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर वातावरण अचानक तापले, कारण राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी उत्साहाच्या भरात थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना इशारा दिला — “अजित पवार, सगळ्यांचा नाद करा पण अनगरकरांचा नाही.” या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादावर आता स्वतः राजन पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माफी मागितली आहे.
राजन पाटील म्हणाले –
“आमच्या गावात कधीच निवडणूक झाली नाही. तरुण पोरं उत्साही असतात. हा
उत्साह व्यक्त करताना माझ्या मुलाने केलेलं वक्तव्य मी समर्थन करणार नाही.
त्याच्या तोंडून नकळत अपशब्द गेले याबद्दल मी अजित पवार आणि पवार कुटुंबाची क्षमा
मागतो. माझी नम्र विनंती आहे की इथून पुढे हा विषय वाढवू नये.”
ते पुढे म्हणाले –
“मी आज ज्या ठिकाणी आहे, त्या प्रवासात शरद
पवार आणि अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. मुलाने भावनेच्या भरात केलेलं वक्तव्य
नको व्हायला हवं होतं. एखादा मुलगा चुकला तर त्याला समजून घ्यायचं असतं. अजित
पवारांनी त्याला पार्थ आणि जय पवारांसारखं समजावं, एवढीच
अपेक्षा.” या घटनांनंतर अनगर नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली, आणि प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.