अमेरिकेतून डिपोर्ट; कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोई अखेर एनआयएच्या जाळ्यात
दिल्ली : कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आणि भारतासह
परदेशातही दहशत निर्माण करणारा अनमोल बिश्नोई अखेर तपास यंत्रणांच्या तावडीत आला
आहे. अमेरिकेतून डिपोर्ट करण्यात आल्यानंतर बुधवारी सकाळी दिल्लीतील इंदिरा गांधी
आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवल्यानंतर एनआयएच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
त्यानंतर त्याला थेट पतियाळा हाऊस कोर्टात हजर केले जाणार आहे. अनमोल बिश्नोईवर सिद्धू
मुसेवाला हत्याकांड, बाबा सिद्दिकी हत्याकांड, तसेच सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारासह अनेक गंभीर आणि हायप्रोफाईल
गुन्ह्यांचे आरोप आहेत. एनआयएने त्याला आपल्या मोस्ट वाँटेड यादीत समाविष्ट केले
होते. मिळालेल्या माहितीनुसार, अनमोलने २०२२ मध्ये बनावट
पासपोर्टच्या मदतीने भारतातून पलायन केले होते. त्यानंतर तो नेपाळ, दुबई, केनिया अशा देशांमध्ये फिरत फिरत अखेर
अमेरिकेत पोहोचला. अमेरिकेतून तो कॅनडामध्येही सतत ये-जा करत होता. याच दरम्यान,
अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने त्याला कॅलिफोर्नियातून
ताब्यात घेतले आणि तो तेव्हापासून स्थानिक पोलिसांच्या कैदेत होता. दरम्यान, मंगळवारी
अमेरिकेकडून २०० भारतीय नागरिकांना डिपोर्ट करण्यात आले. यामध्ये अनमोल बिश्नोईचा
समावेश होता. १९७ जण बेकायदेशीररीत्या अमेरिकेत राहणारे तर २ कुख्यात गुन्हेगार असल्याची
माहिती देण्यात आली. अनमोलच्या अटकेनंतर सिद्धू मुसेवाला हत्याकांडासह अनेक
प्रकरणांच्या तपासाला आता गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.