गुजरातच्या अरवल्ली जिल्ह्यात भीषण दुर्घटना; धावत्या अॅम्बुलन्सला आग, डॉक्टर-नर्ससह चार जणांचा मृत्यू

गुजरातच्या अरवल्ली जिल्ह्यात सोमवारी (17 नोव्हेंबर) सायंकाळी एक भीषण अपघात घडला. मोडासा येथील राणासैयद चौकाजवळ धावत्या अॅम्बुलन्सला अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने संपूर्ण वाहनाला वेढा घेतला आणि चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये डॉक्टर, नर्स, नवजात बालक व त्याचे वडील यांचा समावेश आहे. तर चालक आणि बालकाचा एक नातेवाईक यांना वेळेवर बाहेर काढल्याने ते बचावले. ही अॅम्बुलन्स अहमदाबादच्या ऑरेंज हॉस्पिटलची असून, एका दिवसाच्या नवजात बालकाला प्रसवानंतर पुढील उपचारांसाठी नेत असताना हा अपघात घडला. मोडासा शहरातून जाताना वाहनाच्या मागील बाजूस अचानक आग लागली. काही सेकंदांत आगीने अॅम्बुलन्सचे मागील दार पूर्णपणे व्यापले, ज्यामुळे मागील बाजूस असलेल्या डॉक्टर, नर्स आणि कुटुंबाला बाहेर पडता आले नाही.

घटनास्थळी नागरिकांची धावपळ
प्रसंग पाहताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मोडासा नगरपालिका अग्निशमन दलाला कळवले. अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. स्थानिक पोलिसांनी बचावकार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेचा CCTV फुटेजही समोर आला असून त्यात पेट्रोल पंपाजवळ धगधगती अॅम्बुलन्स स्पष्ट दिसते.

मृतांची ओळख:

  • भाविकाबेन रमणभाई मनात (वय 22) – नर्स (मुळगाव: चिठोडा, हिम्मतनगर)
  • डॉ. राज शांतिलाल रेंटिया (वय 35) – डॉक्टर (मुळगाव: चिठोडा, हिम्मतनगर)
  • नवजात बालक
  • त्याचे वडील

पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.