पुण्यात पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांमुळे मोठा निर्णय; संध्याकाळी ७ नंतर पेट्रोल पंप बंद
पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल पंपांवर काम
करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे गंभीर परिस्थिती
निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पेट्रोल डीलर्स असोसिएशनने कठोर भूमिका घेत संध्याकाळी
सातनंतर पुण्यातील पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचा
थेट परिणाम पुणेकर वाहनचालकांवर होणार असून रात्रीच्या वेळी मोठी गैरसोय निर्माण
होणार आहे. या संदर्भात पेट्रोल डीलर्स असोसिएशनने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार
यांना पत्र पाठवून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत गंभीर चिंता
व्यक्त केली होती. पत्रात असे नमूद करण्यात आले होते की, पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई केली नाही तर सेवा वेळेत बदल करण्यावाचून
पर्याय राहणार नाही. पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या
प्रश्नांवर बोलताना पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ता अली दारूवाला म्हणाले की,
“पुण्यात पेट्रोल पंप चालक आणि कर्मचाऱ्यांवर हल्ल्यांचे प्रकार
वाढले आहेत. आम्ही हे प्रकरण पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणले आहे. जर योग्य
कारवाई झाली नाही आणि गुंडांना आळा घातला नाही, तर आम्ही
पेट्रोल पंप केवळ संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू ठेवणार असल्याचे त्यांना
सांगितले.”
तथापि, ते पुढे म्हणाले की, “पेट्रोल पंप ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे ती बंद करणं शक्य नाही. पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे सक्षम अधिकारी आहेत. ते या प्रकरणावर तोडगा काढतील आणि कर्मचाऱ्यांना संरक्षण देतील अशी आम्हाला आशा आहे.” दरम्यान, जर हा निर्णय अंमलात आणला गेला, तर रात्री सातनंतर पेट्रोल उपलब्ध होणार नसल्यामुळे पुणेकरांना मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.