सांगोला-मिरज रोडवर चोरीच्या दुचाकीचा अपघात; चोरटा ठार, दोन जण गंभीर जखमी

चोरी केलेली दुचाकी घेऊन भरधाव पळत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक देऊन चोरट्याचा मृत्यू झाल्याची घटना सांगोला-मिरज रोडवरील वाटंबरे हद्दीतील पांडेजी धाब्यानजीक गुरुवारी (१३) रात्री ११:३० वाजता घडली. अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची नावे संजय प्रकाश वायभट व रामकृष्ण पुंडलिक वायभट (दोघेही रा. पिंपळनेरी, ता. पाटोदा, जिल्हा बीड) अशी असून त्यांच्यावर सांगोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत दुचाकीचोराचे नाव व पत्ता मिळू शकला नाही.

सांगोला ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंच्या दुचाकी भरधाव वेगात असल्याने अपघात भीषण होता. पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अपघाताची माहिती अशी की, जखमी संजय व रामकृष्ण हे गुरुवारी रात्री ११:३० च्या सुमारास एमएच २३ बीजे २६९९ या दुचाकीने मिरजहून सांगोल्याकडे येत होते. त्याचवेळी चोरीची दुचाकी एमएच ०९ बीएफ ७४०८ वरून चोरटा सांगोल्याकडून मिरज रोडवर वेगात जात होता. वाटंबरे हद्दीतील पांडेजी धाब्यानजीक दोन्ही दुचाकींची समोरासमोर जबर धडक होऊन अपघात झाला. पोलिस पुढील तपास करीत आहेत.