सांगलीत दलित महासंघाचे उत्तम मोहिते यांची वाढदिवशीच निर्घृण हत्या; शाहरुख शेखचा हल्ला
सांगली : सांगली शहर हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. गारपीर
चौकात दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांची वाढदिवशीच निर्घृण हत्या करण्यात
आली. मध्यरात्री शाहरुख शेख या युवकाने धारदार शस्त्राने मोहिते यांच्यावर हल्ला करत
त्यांचा जागीच खून केला. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम मोहिते आणि शाहरुख शेख यांच्यात
गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्वावरून वाद सुरू होता. काल (मंगळवार) मोहिते यांचा
वाढदिवस होता आणि त्यांच्या घराजवळ वाढदिवसासाठी मंडप उभारण्यात आला होता.
शुभेच्छा देण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. कार्यक्रम संपल्यानंतर उत्तम मोहिते
घरात प्रवेश करणार इतक्यात शेख आणि त्याच्या साथीदारांनी अचानक हल्ला केला. मोहिते
यांनी घरात पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा अडकल्याने
ते पूर्ण बंद झाला नाही. त्याच क्षणी शेखने घरात घुसून मोहिते यांच्यावर सपासप वार
केले. गंभीर जखमी झालेल्या मोहिते यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
पोलिस तपास सुरू:
या हल्ल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. हल्ल्यावेळी
झालेल्या गोंधळात शाहरुख शेखचाही मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली
आहे. पोलिसांनी घटनेनंतर तातडीने गारपीर चौक गाठला आणि तपास सुरू केला. मोहिते
यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यावरून हल्ल्याचे नेमके स्वरूप समजून घेण्याचे काम सुरू आहे.
हत्येमागील कारण:
मोहिते आणि शेख यांच्यात सामाजिक वर्चस्व आणि स्थानिक राजकारणावरून
वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. मोहिते यांनी सामाजिक प्रश्नांवरून जिल्हाधिकारी
कार्यालयावर अनेकदा मोर्चे काढले होते. या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये वारंवार
संघर्ष होत होता.