सोलापूरातील तरुण वकिलाची आत्महत्या; सुसाईड नोटमधून कौटुंबिक तणावाची माहिती
सोलापूर : सोलापुरातील एका तरुण वकिलाने रहात्या घरी गळफास घेऊन
आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१२ नोव्हेंबर) उघडकीस आली. मृताचे नाव
सागर श्रीकांत मंद्रुपकर (वय ३२, रा. समर्थ सोसायटी, एसआरपी कॅम्पजवळ, सोलापूर) असे आहे. पोलिसांना
त्याने लिहिलेली सुसाईड नोट सापडली असून त्यात कौटुंबिक तणाव आणि पत्नीबरोबरचे वाद
यांचा उल्लेख आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सागर काही
दिवसांपासून वैवाहिक तणावाखाली होता. त्याला दोन लहान मुले आहेत. मंगळवारी रात्री
त्याचं आईसोबत किरकोळ भांडण झालं होतं. रात्री उशिरा आई-वडील खालच्या मजल्यावर
झोपी गेले, तर सागर वरच्या मजल्यावर आपल्या खोलीत गेला.
सकाळी तो खाली आला नाही म्हणून आईने त्याकडे दुर्लक्ष केले, पण
दुपारी चार वाजता तो अजूनही खाली आला नसल्याने तिने भावाला बोलावले. आई आणि मामा
वरच्या मजल्यावर गेले असता सागरने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. तातडीने
पोलिसांना माहिती देऊन सागरला श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात
आले, मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
उत्तरीय तपासणीदरम्यान पोलिसांना सागरच्या बनियनमध्ये ठेवलेली सुसाईड नोट सापडली.
ती वहीच्या पानावर दोन्ही बाजूंनी लिहिलेली होती — समोरच्या बाजूला पेनने तर मागील
बाजूला पेन्सिलने. प्राथमिक माहितीनुसार, सागरने ही चिठ्ठी
मुद्दाम पोलिसांनाच सापडेल अशा ठिकाणी ठेवली होती. विजापूर नाका पोलिस ठाण्याचे
अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. रात्री उशिर झाल्याने मृतदेहाची उत्तरीय
तपासणी गुरुवारी करण्यात येणार आहे.