सौदी अरेबियात भीषण अपघात; उमराह यात्रेतील ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यूची भीती

सौदी अरेबिया – आज पहाटे सौदी अरेबियातील मक्काह–मदिना महामार्गावर भीषण अपघात झाल्याने मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. उमराह यात्रेवरून परतणाऱ्या भारतीय यात्रेकरूंनी भरलेली एक प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली आणि त्यानंतर बसला भयंकर आग लागली. या दुर्घटनेत किमान ४२ भारतीय यात्रेकरू होरपळून मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना भारतीय वेळेनुसार पहाटे १:३० वाजता मुफ्रीहाट भागात घडली. धडक इतकी जबरदस्त होती की बस ताबडतोब जळू लागली आणि अनेक प्रवासी जागीच मृत्युमुखी पडले. अपघाताच्या वेळी अनेक प्रवासी झोपेत होते आणि काही समजण्यापूर्वीच आग पसरली. स्थानिक पोलिस, सिव्हिल डिफेन्स आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून मृतांचा अचूक आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. बस मधील बहुतेक सर्व प्रवासी हैदराबादचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्यात महिलांचा, पुरुषांचा आणि मुलांचा समावेश होता—२० महिला, ११ मुले असल्याची प्राथमिक माहिती आहे. उमराह पूर्ण केल्यानंतर हे सर्व यात्रेकरू मदीनाला भेट देण्यासाठी जात होते. या भीषण दुर्घटनेने भारतात आणि गल्फमधील भारतीय समुदायात शोककळा पसरली आहे. सौदी अधिकारी आणि भारतीय दूतावास मृत आणि जखमींबाबत अधिकृत माहिती गोळा करण्याचे काम सुरू ठेवले आहे.