चाकण नगराध्यक्ष निवडणुकीत ठाकरे–शिंदे गट हातात हात; शिवसेनेच्या दोन्ही गटांची अनपेक्षित एकजूट

महाराष्ट्रातील राजकारणात शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट निर्माण झाले. हे दोन्ही गट एकमेकांचे तीव्र राजकीय विरोधक मानले जातात. आरोप–प्रत्यारोप, निवडणूक आयोगापासून ते न्यायालयापर्यंत सुरू असलेली पक्ष आणि चिन्हाची लढाई पाहता, हे दोन्ही गट एकत्र येतील असा कोणालाही अंदाज नव्हता. मात्र, चाकण नगराध्यक्ष निवडणुकीत ही अशक्यप्राय गोष्ट प्रत्यक्षात घडली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाकणमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र आले आहेत. शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषा सुरेश गोरे यांच्या अर्ज भरण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे आणि शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे एकत्र उपस्थित होते. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या या अनपेक्षित युतीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मनिषा गोरे यांना दोन्ही गटांचा पाठिंबा

मनिषा गोरे या दिवंगत शिवसेना आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी आहेत. चाकण नगर परिषदेतील शिवसेनेच्या यशस्वी विजयामागे सुरेश गोरे यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या निधनानंतर होणारी ही पहिली निवडणूक असल्याने, त्यांच्या पत्नीला उमेदवारी देत शिंदे गटाने भावनिक निर्णय घेतला आहे. ठाकरे गटानेही दिवंगत सुरेश गोरे यांना आदरांजली म्हणून मनिषा गोरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, हा पाठिंबा युती नसून फक्त स्थानिक परिस्थिती पाहून घेतलेला निर्णय असल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे.

आमदार बाबाजी काळे म्हणाले,
दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या स्मरणार्थ आम्ही हा पाठिंबा दिला आहे. हे राजकारण नसून, कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होण्याचा मानवी दृष्टिकोन आहे. ही कोणतीही राजकीय युती नाही.” तसेच, त्यांनी स्पष्ट केले की उद्धव ठाकरे आणि संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. हा निर्णय फक्त चाकणपुरता आहे. राजगुरुनगर आणि आळंदी येथे आम्ही स्वबळावर लढत आहोत,” असे काळे यांनी सांगितले. 
चाकणमधील हे राजकीय समीकरण आगामी निवडणुकांसाठी कोणते संकेत देते, याबाबत उत्सुकता वाढलेली आहे.