कामशेत येथे भीषण अपघात; कंटेनर वारकऱ्यांच्या दिंडीत शिरला, एका महिलेचा मृत्यू, 10 जखमी

पुणे: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मावळ तालुक्यातील कामशेत भागात शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव कंटेनर शिरल्याने या दुर्घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे १० वारकरी जखमी झाले असून त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिकी एकादशी निमित्ताने उरण तालुक्यातील बसावी गावातील वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरकडे जात होती. वारकऱ्यांचा मुक्काम कामशेत येथील भैरवनाथ मंदिरात होता. सकाळच्या सुमारास दिंडी प्रस्थान करत असताना पुण्याच्या दिशेने वेगाने येणाऱ्या कंटेनरने नियंत्रण गमावून दिंडीत घुसकला. या घटनेत एक महिला कंटेनरखाली चिरडली गेली, तर इतर वारकरी रस्त्यावर फेकले गेले. घटनास्थळी नागरिक आणि वारकरी मोठ्या संख्येने जमा झाले असून त्यांनी अपघाताविरोधात आंदोलन सुरू केले आहे. कामशेत पोलिस स्टेशनचे निरीक्षक शंकर पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वारकऱ्यांना समजावत सांगितले की, जखमींना तातडीने महावीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवणे आवश्यक आहे, मात्र वारकरी संतप्त असल्याने रस्ता अद्याप ठप्प आहे. पोलीसांनी घटनास्थळी वाहतूक वळवली असून कंटेनर चालक फरार असल्याचे सांगितले जात आहे. पुढील तपास सुरू आहे.