आंध्र प्रदेशात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक; ७ नक्षलवादी ठार
आंध्र प्रदेश :- आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील मारेदुमिल्ली जंगल परिसरात बुधवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या तीव्र चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहेत. यामध्ये तीन महिला नक्षलवादींचाही समावेश असल्याचे राज्य गुप्तचर विभागाचे एडीजी (लॉ अँड ऑर्डर) महेश चंद्र लड्ढा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ही कारवाई मंगळवारी सकाळपासून सुरू झाली होती आणि बुधवारीही जंगलात स्पॉट चकमक झाली. ठार झालेल्यांमध्ये आंध्र–ओडिशा सीमा (AOB) झोनचा महत्त्वाचा तांत्रिक तज्ज्ञ मेतुरी जोगाराव ऊर्फ शंकर (मूळ श्रीकाकुलम) याचाही समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे. शंकर हा AOB एरिया कमिटी मेंबर (ACM) होता. तो शस्त्रास्त्र निर्मिती, संप्रेषण प्रणाली हाताळणे आणि तांत्रिक नेटवर्क उभारणे यात तज्ज्ञ मानला जात होता. गेल्या ४८ तासांत एकूण १३ नक्षलवादी ठार करण्यात आले आहेत.
जपाटून अटक मोहीम – ५० हून अधिक नक्षलवादी जेरबंद हिडमा गटातील कमांडरच्या मृत्यूनंतर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी व्यापक प्रमाणात छापेमारी सुरू केली. आंध्र प्रदेशातील एनटीआर, कृष्णा, काकीनाडा, कोनासीमा आणि एलुरू जिल्ह्यांतून ५० पेक्षा जास्त नक्षलवादी अटक करण्यात आले आहेत. अटक झालेल्यांमध्ये केंद्रीय समितीचे सदस्य, राज्य समिती सदस्य, एरिया कमिटी मेंबर्स आणि प्लॅटून-लेव्हल कमांडर्स यांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांचे म्हणणे आहे की नक्षलवादी छत्तीसगडहून आंध्र–ओडिशा सीमेवर नवीन बेस तयार करण्याचा प्रयत्न करत होते. स्थानिक कॅडर पुन्हा सक्रिय करण्याचे त्यांचे हालचालीवर गुप्तचर विभागाने सतत लक्ष ठेवले होते. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले असून कोणताही जवान जखमी झालेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून आंध्र–ओडिशा सीमेवर नक्षलवादी सक्रिय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.