ऑपरेशन हॉकआय : अमेरिकेचा सिरियात मोठा हवाई हल्ला, ISIS चे अनेक अड्डे उद्ध्वस्त

अमेरिकेने सिरियामध्ये इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेविरोधात मोठा हवाई हल्ला केला आहे. १३ डिसेंबर रोजी सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात दोन अमेरिकन जवान आणि एक अमेरिकन नागरिक ठार झाले होते, तर तीन सैनिक गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यासाठी ISIS ला जबाबदार धरत अमेरिकेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

या लष्करी कारवाईला ‘ऑपरेशन हॉकआय’ असे नाव देण्यात आले असून, इस्लामिक स्टेटचे संपूर्ण नेटवर्क नष्ट करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याची माहिती अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, अमेरिका आपल्या नागरिकांवर आणि सैनिकांवर होणारे हल्ले सहन करणार नाही. अमेरिकन लोकांना लक्ष्य करणाऱ्यांचा पाठलाग करून त्यांना संपवले जाईल. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या मोहिमेअंतर्गत मध्य सिरियामधील ISIS शी संबंधित सुमारे ७० ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले. यामध्ये दहशतवाद्यांचे तळ, शस्त्रसाठे आणि प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे. या हल्ल्यांमुळे ISIS चे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर म्हटले की, अमेरिकेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही दहशतवादी संघटनेला यापुढे अधिक कठोर आणि धोकादायक प्रत्युत्तर दिले जाईल. पेंटागॉनकडून येत्या काही दिवसांत आणखी लष्करी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.