ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शालिनीताई पाटील यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या पत्नी तसेच ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्या ९४ वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून शालिनीताई पाटील यांची प्रकृती खालावली होती. अखेर मुंबईतील माहिम येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. शालिनीताई पाटील यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान दिले. काँग्रेस पक्षात त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळत संघटनात्मक पातळीवर मोलाची भूमिका बजावली. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या राजकीय वाटचालीत त्यांनी खंबीर साथ दिली होती. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षावर शोककळा पसरली असून अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. शालिनीताई पाटील यांच्यावर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.