राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता, आजपासून आचारसंहिता लागू होणार?
राज्यातील प्रलंबित असलेल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर येत
आहे. आज सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत
निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यास राज्यात तत्काळ आचारसंहिता लागू होण्याची
शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार, यावेळी सर्व महापालिका
निवडणुका एकाच टप्प्यात घेण्यात येण्याची शक्यता आहे. याआधी 50 टक्के आरक्षण मर्यादेमुळे नागपूर आणि चंद्रपूर महापालिकांच्या निवडणुका
पुढे ढकलल्या जातील, असे बोलले जात होते. मात्र आता या
दोन्ही महापालिकांसह राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार
पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महापालिका
निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, 17
जानेवारी रोजी मतमोजणी होईल. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच
आचारसंहिता लागू होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद निवडणुका कधी?
महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील 20
जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांहून
अधिक गेल्याने पुन्हा आरक्षण सोडत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीनंतरच जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग
मोकळा होणार आहे. अंदाजानुसार, जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात
जिल्हा परिषद निवडणुकांचे मतदान होऊ शकते. दरम्यान, सर्वोच्च
न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
न्यायालयाच्या कठोर भूमिकेमुळे राज्यातील निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे.