अमित ठाकरेंवरील गुन्ह्यानंतर राजकीय खळबळ; शर्मिला ठाकरेंचा सत्तेवर जोरदार हल्लाबोल

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आदित्य ठाकरेंनंतर आता अमित ठाकरे यांच्या आई शर्मिला ठाकरे यांनीही सरकारवर सरळ निशाणा साधला. शिवाजी महाराजांचा पुतळा चार महिन्यांपासून जुने, फाटके कापड टाकून झाकून ठेवला होता. अमित ठाकरे यांनी त्याचे अनावरण करून सन्मान राखला तरी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची टीका त्यांनी केली. प्रभादेवी येथील एका कॅफेच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “1800 कोटींचा जमीन घोटाळा होतो, पण गुन्हा दाखल होत नाही. सध्या खोटं बोला आणि रेटून बोला हे काम सुरू आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “मीसुद्धा बघते माझ्यावर कधी केस होते. निवडणुकीसाठी यांना फक्त महाराज दिसतात. किल्ल्यावर नमो सेंटर उभारण्याचा प्रयत्न चालू आहे; हे आम्ही होऊ देणार नाही.” त्यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यावरूनही सरकारवर टीका केली. बिहार निवडणूक आणि मतदानावर टीका बिहार निकालाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “3.50 कोटी मतदार असून 7 कोटी मतदान झाले—हे कसे शक्य आहे? मुंबईसह महाराष्ट्रातून ट्रेन भरून तिकडे गेले, ते तिकडे आणि इकडेही मतदान करणार.”

त्यांनी नागरिकांनी संकटात साथ देणाऱ्यांना मतदान करावे, असे आवाहन केले. शिवसेना व राष्ट्रवादीला थेट आव्हान शर्मिला ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या प्रलंबित खटल्यांवर प्रश्न उपस्थित करत म्हटले— शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस तीन वर्षांपासून चालू आहे. निकाल येईपर्यंत निवडणुका होऊन जातील. पक्ष बळकावून घेतले जात आहेत. जर इतका विश्वास असेल तर मैदानात या आणि निवडणूक लढा.” या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तापमान चढले आहे.