अनगर नगराध्यक्ष निवडणुकीत धक्कादायक वळण; उज्ज्वला थिटे यांचा अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद

सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मंगळवारी मोठे राजकीय नाट्य घडले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणामुळे अवैध ठरवण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी सूचकाची (Proposer) सही नसल्यामुळे हा अर्ज बाद केला. अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी अर्जावरील कमतरता दाखवून दिल्यानंतर हा धक्कादायक निर्णय झाला. या निर्णयामुळे अनगरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अनेक वर्षांपासून अनगरमध्ये प्रभाव ठेवणाऱ्या माजी आमदार राजन पाटील यांच्या राजकारणाला थेट फटका बसल्याचे चित्र आहे.

राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी

अनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाल्यापासून ही निवडणूक अधिक प्रतिष्ठेची झाली होती. माजी आमदार राजन पाटील यांचे गेल्या अनेक वर्षांपासून अनगरवर वर्चस्व असून, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेल्यानंतर अजित पवारांनी उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी देऊन त्यांना आव्हान दिले होते.

उज्ज्वला थिटे यांनी आरोप केला होता की:

  • उमेदवारी अर्ज भरू नये म्हणून विरोधकांनी गुंडांची फौज उभी केली
  • कार्यालयात पोहचू नये म्हणून अडथळे निर्माण केले
  • यंत्रणेद्वारे दबाव आणला

सोमवारी पहाटे ५ वाजता अखेर त्यांनी पोलीस संरक्षणात उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

अनगरमध्ये १७ जागा बिनविरोध; प्राजक्ता पाटील ठरल्या नगराध्यक्षा

अनगरमध्ये कोणीही विरोधी उमेदवार उभा न राहिल्याने राजन पाटील पॅनेलच्या १७ जागा बिनविरोध निवडून आल्या.
नगराध्यक्षपदासाठी प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांनी उमेदवारी दाखल केली होती. अर्जांची छाननीदरम्यान उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यामुळे प्राजक्ता पाटील यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणाले: उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नव्हती. नियमानुसार हा अर्ज अवैध ठरतो.”

 

उज्ज्वला थिटे यांचा संतप्त प्रतिक्रिया

अर्ज बाद झाल्यानंतर थिटे म्हणाल्या:

  • ४ ते ५ दिवस संघर्ष करून अर्ज भरला.”
  • प्रत्येक कागदपत्र वकिलांकडून तपासून घेतलं.”
  • सूचक म्हणून माझा मुलगाच माझ्यासोबत होता; मग सही राहिलीच कशी?”
  • हा प्रकार संशयास्पद असून मी कोर्टात दाद मागणार आहे.”

NCP नेतेंचा आरोप : सही गायब करण्याचे टेक्निक वापरले का?

राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी गंभीर आरोप करत म्हणाले:

  • सूचकाची सही निवडणूक अधिकाऱ्यांसमोर करण्यात आली होती.”
  • तरीही सही नाही म्हणून अर्ज बाद? हे कसं शक्य?”
  • प्रशासनाने काही 'टेक्निक' वापरून सही गायब केली का?”

ते म्हणाले की या प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी.