कमला पसंद समूहाच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू; सासरकडून मानसिक त्रासाचे गंभीर आरोप
दिल्लीतील वसंत विहार परिसरात ‘कमला पसंद’ आणि ‘राजश्री’
पान मसाला समूहाशी संबंधित एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. समूहाचे सहमालक कमल
किशोर चौरसिया यांच्या 40 वर्षीय सुने दीप्ती चौरसिया यांचा
मृतदेह मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी साडीला लटकलेल्या अवस्थेत आढळला. घटनास्थळी
दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. घटनास्थळी
सापडलेल्या दीप्तीच्या डायरीत पतीसोबत झालेल्या वादांचा उल्लेख असल्याचे समजते.
मात्र कुणावर थेट आरोप नाहीत. तरीही दीप्तीच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरकडून
मानसिक छळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप करून पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
दीप्तीचा विवाह 2010 मध्ये हरप्रीत चौरसिया यांच्यासोबत झाला
होता. त्यांना 14 वर्षांचा मुलगा आहे. हरप्रीत यांचे दोन
विवाह झाल्याची माहिती समोर आली असून दुसरी पत्नी दक्षिण भारतीय चित्रपटातील
अभिनेत्री असल्याचे सांगितले जाते.
दीप्तीने आपल्या नोटमध्ये लिहिले आहे—
“ज्या नात्यात प्रेम नाही, विश्वास नाही…
त्या नात्यात राहण्याची आणि जगण्याची काय गरज?”
या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना पोस्टमॉर्टम
अहवालाची प्रतीक्षा आहे. मृत्यूचे नेमके कारण, तसेच लावण्यात आलेल्या आरोपांची
वस्तुस्थिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, ‘कमला
पसंद–राजश्री’ समूह देशभरात एक मोठा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. सुमारे 40–45
वर्षांपूर्वी कानपूरमध्ये छोट्या दुकानातून सुरू झालेल्या या
उद्योगाने आज अब्जावधी रुपयांच्या साम्राज्यात रुपांतर केले आहे. या ब्रँडचा
उत्पादन हक्क कमला कांत कंपनी LLP कडे आहे आणि देशातील अनेक
महानगरांत या पान मसाल्याची मोठी मागणी आहे.