अंबरनाथ उड्डाणपूल भीषण अपघात: कार अनियंत्रित होऊन चौघांचा मृत्यू; शिवसेना उमेदवार किरण चौबे किरकोळ जखमी

अंबरनाथ : अंबरनाथ उड्डाणपुलावर शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघात घडला असून, भरधाव कारने नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या दोन ते तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. या गंभीर अपघातात कार चालकासह चौघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक पादचारीचाही समावेश आहे. ही कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या महिला उमेदवार किरण चौबे यांची असल्याचे समोर आले आहे. प्रचार कार्यक्रम संपवून घरी परतत असताना हा प्रकार घडला. जखमींमध्ये किरण चौबे यांचाही समावेश असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी सायंकाळी किरण चौबे या अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी सभेसाठी जात होत्या. पूर्वेकडून पश्चिमेकडे उड्डाणपुलावर जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की एक दुचाकीस्वार थेट पुलाखाली फेकला गेला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, कार चालक लक्ष्मण शिंदे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अपघातावेळी त्यांचा पाय अॅक्सिलरेटरवर अडकलेला होता, ज्यामुळे कार अनियंत्रित अवस्थेत वेगाने पुढे जात राहिली.

शिवसेना उमेदवाराचे विधान

किरण चौबे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितले की,
गाडी पुलावरून जात असताना चालक लक्ष्मण शिंदे यांना फोन आला. ते बोलत असतानाच अचानक शांत झाले. लगेचच दिसले की त्यांचा पाय अॅक्सिलरेटरवर जोरात दाबला गेला आहे. मी काही विचारण्याआधीच गाडी अनियंत्रित होऊन वेगाने धावू लागली आणि अपघात झाला.”

मृत आणि जखमी

या अपघातात खालील चार जणांचा मृत्यू झाला:

  • लक्ष्मण शिंदेकार चालक
  • शैलेश जाधवअंबरनाथ पालिका कर्मचारी
  • चंद्रकांत अनर्थेअंबरनाथ पालिका कर्मचारी
  • सुमित चेलानीपादचारी

जखमींमध्ये किरण चौबे यांच्यासह आणखी दोन जणांचा समावेश आहे. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. अंबरनाथ पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.