मोहोळ नगराध्यक्षपदी शिंदेसेनेचा झेंडा; २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे यांचा दणदणीत विजय
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष
पदाच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ने मोठा विजय मिळवत भाजपला जोरदार धक्का
दिला आहे. शिंदेसेनेच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या शीतल क्षीरसागर
यांचा तब्बल १७० मतांनी पराभव करत नगराध्यक्षपद पटकावले आहे. अवघ्या २२ वर्षांच्या
सिद्धी वस्त्रे या या विजयासह राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष ठरल्या आहेत. या
निकालामुळे मोहोळ तालुक्यात शिंदेसेनेचे वर्चस्व स्पष्ट झाले असून भाजपच्या गोटात
अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषतः भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांच्यासाठी हा
निकाल मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
मोहोळ नगरपरिषदेच्या एकूण २० जागांपैकी ९ जागा
शिंदेसेनेने जिंकल्या आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी मोहोळमध्ये जाहीर सभा घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर हा विजय शिंदेसेनेसाठी
अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
विजयानंतर शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोहोळ शहरात
जल्लोष केला. या निकालामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात नवी समीकरणे तयार
होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धी
वस्त्रे यांनी जनतेचे आभार मानले. “जनतेने दिलेला कौल माझ्यावरील विश्वास दर्शवतो.
निवडणूक काळात माझ्यावर अनेक टीका झाल्या, मात्र आजचा निकाल हेच त्या टीकेला उत्तर
आहे. शहराचा सर्वांगीण विकास करणे आणि नागरिकांच्या समस्या सोडवणे हीच माझी
प्राथमिकता असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.